अमेरिकेतील मंदीवरून सारवासारव करणाऱ्या बायडेन प्रशासनावर बँक ऑफ अमेरिकाच्या प्रमुखांची जोरदार टीका

वॉशिंग्टन – अमेरिकेत मंदी आलेली आहे की नाही, यावर तांत्रिक चर्चा सुरू आहे. पण या चर्चेत मुलभूत गोष्टीचा समावेश नाही. ती म्हणजे अमेरिकन जनतेला वाढलेले घरभाडे आणि इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. अशा वेळी मंदीची व्याख्या सांगून अमेरिकेत मंदी नसल्याचे दावे व्हाईट हाऊसकडून केले जात आहेत, ही देशासाठी लाभदायी बाब ठरणार नाही’, अशा शब्दात बँक ऑफ अमेरिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन मॉयनीहान यांनी बायडेन प्रशासनाला फटकारले आहे.

brain-moynihanराष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या चुकीच्या धोरणांमुळे गेले वर्षभर अमेरिकेत महागाईत सातत्याने वाढ होत आहे. या विक्रमी महागाईचा जबरदस्त फटका सामान्य अमेरिकी जनतेला बसत आहे. गेल्या सहा महिन्यात अमेरिकी नागरिकांना आपल्या आपत्कालिन बचतीतील तब्बल ११४ अब्ज डॉलर्सची रक्कम खर्च करावी लागल्याचे उघड झाले होते. महागाई, बेरोजगारी व मंदी यांना तोंड देणाऱ्या अमेरिकी नागरिकांनी आता आपला मोर्चा फूड बँकांकडे वळविल्याच्या बातम्या येत आहेत.

यामुळे अमेरिकी जनतेत बायडेन प्रशासनाविरोधातील नाराजी वाढत असून गेल्याच महिन्यात प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणात ८८ टक्के मतदारांनी देश चुकीच्या मार्गावर चालल्याचे म्हटले होते. तर ५४ टक्के मतदारांनी अमेरिकी मध्यमवर्गाला बायडेन यांच्या धोरणाचा काडीचाही फायदा झाला नसल्याची टीका केली होती. देशभरातून ताशेरे ओढले जात असताना, व्हाईट हाऊसने अमेरिकेत मंदी आहे की नाही, हे स्पष्ट करणारी माध्यमांची बैठक घेतली होती. यामध्ये व्हाईट हाऊसने मंदीची व्याख्या मांडून आपल्या देशात मंदी नाही, असे पटवून देण्याचा प्रयत्न इथे केला होता.

यावर व्हाईट हाऊस राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत असल्याची टीका अमेरिकेच्या सोशल मीडियातून झाली होती. तर बायडेन प्रशासनाने केलेल्या या प्रकाराचा अमेरिकेसह युरोपातील विश्लेषकांनी खरपूस समाचार घेतला होता. बायडेन प्रशासनाकडे आर्थिक सुधारणांसाठी ठोस धोरण नसल्याचे या विश्लेषकांनी म्हटले होते. याचा परिणाम अमेरिकेतील शेअर बाजारावर झाला असून मोठमोठ्या बँका आणि वित्तसंस्था संकटात आल्या आहेत.

बँक ऑफ अमेरिका ही यापैकी एक बँक ठरते. या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन मॉयनीहान यांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना, मंदीची व्याख्या सांगणाऱ्या व्हाईट हाऊसवर पहिला हल्ला चढविला. ‘अमेरिकन जनतेला या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सहाय्य हवे आहे’, अशी मागणी मॉयनीहान यांनी केली. तसेच अमेरिकन जनतेला यावेळी नेमके काय वाटत आहे, याची व्हाईट हाऊसला जाणीव नाही, अशी खरमरीत टीका बँक ऑफ अमेरिकेच्या प्रमुखांनी केली.

अमेरिकेची अर्थव्यवस्था सावरून जनतेला सहाय्य पुरविण्यासाठी आवश्यक असलली योजना किंवा आर्थिक कार्यक्रमच बायडेन यांच्या प्रशासनाकडे नाही, ही बाब मॉयनीहान यांच्या टीकेमुळे आणखी एकवार जगासमोर आली आहे.

leave a reply