अमेरिका अणुकरारासाठी इराणच्या मागण्या मान्य करून सवलतीही देणार

- ब्रिटनस्थित इराणी वृत्तसंस्थेचा दावा

अणुकरारासाठीतेहरान/लंडन/वॉशिंग्टन – अमेरिकेच्या कैदेत असलेल्या इराणींची सुटका, १७ इराणी बँका आणि १५० संबंधितांची निर्बंधातून सवलत, प्रतिदिनी पाच कोटी बॅरल्स इंधनाच्या विक्रीला मान्यता आणि कोरियन बँकेत गोठवलेले सात अब्ज डॉलर्सवरील निर्बंध मागे, घेण्याबाबतचे काही महत्त्वाचे निर्णय अमेरिका लवकरच घेईल. अणुकरारासाठी उत्सूक असलेले बायडेन प्रशासन इराणच्या या मागण्या मान्य करून सवलतीही देणार आहे. हे सारे दावे ब्रिटनस्थित इराणी वृत्तसंस्थेने केले आहेत. इराणच्या नेत्यांकडे अमेरिकेकडून मिळणाऱ्या सवलतींची यादी पाठविली जात असल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी व्हिएन्ना येथे अमेरिका व इराणच्या प्रतिनिधींमध्ये अप्रत्यक्ष वाटाघाटी पार पडल्या होत्या. यानंतर युरोपिय महासंघाने दोन्ही देशांना अणुकराराबाबत अंतिम प्रस्ताव दिला. तसेच यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नसल्याचे महासंघाने स्पष्ट केले होते. हा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी इराण तयार आहे, पण त्याआधी अमेरिका व युरोपिय महासंघाने इराणवरील निर्बंध शिथिल करण्याबाबत तसेच सुरक्षेबाबत हमी द्यावी, अशी मागणी इराणच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने केली होती. यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी इराणने फारशा अपेक्षा बाळगू नये, असे म्हटले होते.

पण लंडनस्थित इराणी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अणुकरारासाठी उत्सूक असलेला अमेरिका इराणला सवलती देणार आहे. उभय देशांमधील अणुकरार कार्यान्वित होण्यासाठी किमान १२० दिवसांचा कालावधी लागेल. पण त्यानंतर बायडेन प्रशासन इराणने प्रस्तावित केलेल्या मागण्या मान्य करणार असल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. यामध्ये निर्बंधांच्या अंतर्गत अमेरिकेने अटक केलेल्या इराणींची सुटका करण्यात येईल. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेने निर्बंध टाकलेल्या १७ बँका आणि १५० इराणसंलग्न संस्थांना सवलत देण्यात येईल. तसेच दक्षिण कोरियाच्या बँकेत गोठविलेले सात अब्ज डॉलर्स इराणकडे वर्ग करण्याची सूचना केली जाईल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे इराणच्या इंधनावरील निर्बंध मागे घेण्यात येतील. यानुसार इराण वैधरित्या प्रतिदिन पाच कोटी बॅरल्स इंधनाची विक्री आंतरराष्ट्रीय बाजारात करील. यामुळे इराणच्या इंधनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील निर्यात वाढेल आणि युरोपमधील देशांसाठी इराणकडून इंधन खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होईल, असा दावा सदर वृत्तसंस्थेने केला.

बायडेन प्रशासन देणार असलेल्या या सवलतींचे संदेश इराणमधील खामेनी राजवटीच्या नेत्यांमध्ये फिरत असल्याची माहिती या वृत्तसंस्थेने दिली. तर गेल्या काही दिवसांमध्ये इराणच्या सरकारी वृत्तसंस्थांनी देखील यातील काही सवलतींचा उल्लेख केला होता. त्यामुळे बायडेन प्रशासन इराणच्या मागण्या मान्य करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

पण अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या प्रवक्त्या अँड्रिन वॅटसन यांनी सदर वृत्त फेटाळले आहे. इराणच्या मागण्या मान्य केल्या किंवा त्यांना सवलती देत असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे वॅटसन यांनी स्पष्ट केले. मात्र इराणी वृत्तसंस्थेने दिलेल्या या बातमीवर इस्रायलकडून प्रतिक्रिया आली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने इराणबरोबर सुरू असलेल्या आण्विक वाटाघाटीतून माघार घ्यावी, अशी मागणी इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांनी केली. इराण आपला अणुकार्यक्रम रोखण्यासाठी तयार नसताना वाटाघाटींसाठी धडपड करून पाश्चिमात्य देश आपली असमर्थता दाखवून देत असल्याची टीका इस्रायलच्या पंतप्रधानांनी केली आहे.

दरम्यान, पाश्चिमात्य देश व इराणमधील अणुकराराशी इस्रायल बांधिल नसेल, असा इशारा इस्रायलने याआधीच दिला होता. तसेच इस्रायलची लढाऊ विमाने इराणच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ल्यासाठी तयार असल्याची घोषणाही इस्रायलने केली होती.

leave a reply