जैविक युद्धाला तोंड देण्यासाठी सज्ज रहा

- संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांचा संदेश

जैविक युद्धाला तोंडनवी दिल्ली – जैविक युद्धाला तोंड देण्यासाठी सज्ज व्हा, असा संदेश भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिला आहे. जैविक युद्ध हे नवे युद्धतंत्र ठरते आणि पुढच्या काळात याचा सामना करण्यासाठी देशांनी तयार रहावे. तसेच देशांच्या लष्करांनीही या युद्धाच्या आघाडीवर आपल्या देशाला सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी सज्ज राहिले पहिजे’, असे संरक्षणदलप्रमुखांनी ‘बिमस्टेक’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या आरंभसोहळ्यात बजावले. तर भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा उदय पाहता, हे संकट इतक्या टळणार नाही, याची परखडपणे जाणीव करून दिली.

कोरोनाच्या साथीचा उगम चीनमध्ये झाला व चीनने अजूनही याच्या उगमाची विश्‍वासार्ह माहिती जगाला पुरविलेली नाही. किंबहुना बराच काळ चीनने या साथीबाबत लपवाछपवी करून योजनाबद्धरित्या ही साथ जगभरात पसरू दिली, असे आरोप होत आहेत. काही विश्‍लेषक तर हा चीनच्या जैविक युद्धाचा भाग असल्याचे सांगून याचे पुरावे देखील जगासमोर मांडत आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी चीनवर उघडपणे तसे आरोप केले होते. अधिकृत पातळीवर नाही, पण काही देशांच्या आजी व माजी अधिकार्‍यांनी कोरोनाच्या साथीमागे चीनचे भयंकर कारस्थान असल्याचे बजावले होते. या पार्श्‍वभूमीवर, संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांनी जैविक युद्धाबाबत दिलेला हा इशारा लक्षवेधी ठरतो.

भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड या देशांच्या ‘बिमस्टेक’ने (बे ऑफ बेंगॉल इनिशिएटीव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन) आयोजित केलेल्या ‘पॅनेक्स-२१’ या आपत्ती निवारणासंदर्भातील बहुराष्ट्रीय सरावाच्या उद्घाटन समारोहात बोलताना जनरल रावत यांनी हा इशारा दिला. ‘गेल्या काही वर्षात जगभरात काही नैसर्गिक तर काही माननिर्मित आपत्ती आल्या. यामध्ये त्सुनामी, भूकंप आणि अतिवृष्टीमुळे आलेले महापूर व कोरोनाच्या साथीचा समावेश आहे. अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे. इतके नाही तर अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्वच देशांनी एकजूट करून एकमेकांना आवश्यक ते सहाय्य पुरविण्याची तयारी ठेवायला हवी’, असे जनरल रावत म्हणाले.

‘कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉन समोर आला असून पुढच्या काळातही अशी संकटे समोर येत राहतील. हा जैविक युद्धाचा भाग असू शकतो व या नव्या युद्धतंत्राचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे’, असा संदेश यावेळी जनरल रावत यांनी दिला. तसेच अशा आव्हानात्मक परिस्थितीत लष्करांनी आपल्या देशाला सर्वतोपरी सहाय्य करण्याची सिद्धता ठेवावी, असे जनरल रावत पुढे म्हणाले. ओमिक्रॉनचा दाखला देऊन लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनीही यावेळी कोरोनाची साथ इतक्यात संपणार नाही, असा इशारा यावेळी दिला. काही दिवसांपूर्वी देशाचे नवे नौदलप्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार यांनीही संरक्षणदलांसमोर कोरोनाची साथ हे आव्हान असल्याचे म्हटले होते. त्यामुळे कोरोना हा जैविक युद्धाचा भाग असून त्याचा संरक्षणदलांच्या सिद्धता व क्षमतेवर परिणाम होणार नाही, याबाबत संरक्षणदल सावध असल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे देशाला जैविक युद्धापासून असलेल्या धोक्याची जाणीव करून देऊन एकजुटीने या संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवण्याचे सल्ला संरक्षणदलांकडून दिला जात आहे.

दरम्यान, २० ते २२ डिसेंबर रोजी पूणे येथे बिमस्टेक देशांच्या युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सेमीनार्स तसेच टेबलटॉप सरावाबरोबर मल्टी एजन्सी सराव होणार असल्याचे सांगितले जाते.

leave a reply