युक्रेनने हवाईहद्दीचे उल्लंघन केल्याचा बेलारूसचा आरोप

हवाईहद्दीचे उल्लंघनमॉस्को – बेलारूसने युक्रेनवर हवाईहद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. ‘युक्रेनला सीमावाद चर्चेने सोडवायचा नाही का’, असा जाब विचारून बेलारूसने युक्रेनच्या दूतावासातील लष्करी अधिकार्‍याला समन्स बजावले. दरम्यान, रशियाकडून मिळणार्‍या लष्करी सहाय्याच्या बळावर बेलारूस युक्रेनविरोधात आक्रमक भूमिका घेत असल्याचा आरोप केला जातो. बेलारूसने आक्रमकता कायम ठेवली तर येत्या काळात युक्रेन व बेलारूसमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो, असा इशारा युक्रेनच्या नेत्यांनी काही आठवड्यांपूर्वीच दिला होता.

रशियाने युक्रेनच्या उत्तर तसेच पूर्व सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्यतैनाती केली आहे. जवळपास दोन लाख रशियन जवान तसेच रणगाडे, क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा युक्रेनच्या लुगान्स्क, डोन्स्तेक प्रांतांजवळ ही तैनाती केल्याचे आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर युक्रेनच्या लष्कराने आपल्या सीमेजवळ युद्धसरावाचे आयोजन केले आहे. शनिवारी हा सराव सुरू असताना युक्रेनच्या हेलिकॉप्टरने आपल्या हवाईहद्दीत जवळपास एक किलोमीटरपर्यंत घुसखोरी केल्याचा आरोप बेलारूस करीत आहे.

हवाईहद्दीचे उल्लंघनरविवारी बेलारुसच्या संरक्षण मंत्रालयाने राजधानी मिंस्कमधील युक्रेनच्या दूतावासातील लष्करी अधिकार्‍याला समन्स बजावले. युक्रेनच्या हेलिकॉप्टरने बेलारूसच्या हवाईहद्दीचे उल्लंघन केल्याचा ठपका यात ठेवण्यात आला आहे. ‘आंतरराष्ट्रीय नियमांनुसार युक्रेनला सीमावादावर तोडगा काढायचा नाही, ही फारच चिंतेची बाब ठरते. यावरुन बेलारूसच्या दक्षिण सीमेला युक्रेनकडून धोका असल्याचे स्पष्ट होते’, असा इशारा बेलारूसच्या संरक्षण मंत्रालयाने दिला.

युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हवाईसीमेच्या उल्लंघनाचे बेलारूसचे आरोप धुडकावले आहेत. याआधीही बेलारूस आणि युक्रेनमध्ये सीमावाद पेटला होता. पण गेल्या काही आठवड्यांपासून युक्रेनच्या सीमेजवळ सुरू असलेल्या घडामोडीनंतर बेलारूसच्या इशार्‍यांकडे गांभीर्याने पाहिले जाते.

गेल्या ऑगस्ट महिन्यात बेलारूसमध्ये राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांच्याविरोधात आंदोलन सुरू होते. या आंदोलनावर केलेल्या कारवाईवरून अमेरिका व युरोपिय देशांनी बेलारूसवर निर्बंध लादले आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिका व युरोपिय महासंघाने बेलारूसवर नव्या निर्बंधांची घोषणा केली होती. तर बेलारूसला समर्थन देणार्‍या रशियाने या निर्बंधांवर टीका केली होती.

पाश्‍चिमात्य देशांच्या या निर्बंधातून बाहेर पडण्यासाठी रशियाने बेलारूसला व्यापारी तसेच लष्करी सहाय्य पुरविले आहे. या मोबदल्यात रशियाने बेलारूसमधील रशियन सैन्याची तैनाती वाढविली असून नजिकच्या काळात रशियन क्षेपणास्त्र यंत्रणाही बेलारूसमध्ये तैनात होतील, अशी भीती युक्रेन व नाटोचे लष्करी अधिकारी व्यक्त करीत होते. रशियाकडून मिळणार्‍या या लष्करी सहाय्यामुळेच बेलारूसने युक्रेनविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारल्याचे दावे केले जातात.

आपली राजवट टिकविण्यासाठी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी ‘डील’ केल्याचा आरोप युक्रेनमध्ये होत आहे. याअंतर्गत बेलारूस रशियाच्या साथीने युक्रेनवर हल्ला चढवू शकतो, असे युक्रेनच्या सत्ताधारी पक्षाने काही आठवड्यांपूर्वी बजावले होते. असे झाले तर युक्रेन व बेलारूसमध्ये घनघोर युद्ध पेट घेईल, असा इशारा युक्रेनच्या नेत्यांनी दिला होता.

leave a reply