भारताबरोबरील दृढ संबंधांसाठी बायडेन प्रशासन वचनबद्ध

- अमेरिकेच्या नव्या संरक्षणमंत्र्यांची ग्वाही

वॉशिंग्टन – भारत-अमेरिका संबंध अधिक भक्कम करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे प्रशासन वचनबद्ध आहे, असे अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी स्पष्ट केले. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी याची ग्वाही दिल्याचे पेंटॅगॉनने दिली. गुरुवारी उभय देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी फोनवरून चर्चा पार पडली होती. बायडेन प्रशासनाचे इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबतचे धोरण, त्यातही भारतविषयक भूमिका आधीच्या ट्रम्प प्रशासनापेक्षा खूपच वेगळी असेल, अशी चिंता काही विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी गुरुवारी भारताच्या संरक्षणमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली.

भारत-अमेरिकेचे संबंध समान मुल्य व एकसमान हितसंबंधांवर आधारलेले आहेत. हे संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन प्रशासन वचनबद्ध असल्याचे संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी या चर्चेत स्पष्ट केले.

अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनचे माध्यम सचिव जॉन किरबाय यांनी माध्यमांना उभय देशांच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती दिली. यावेळी दोन्ही देशांच्या हितसंबंधांमध्ये ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्राचा समावेश आहे व त्यावरही संरक्षणमंत्र्यांची चर्चा झाल्याचे किरबाय यांनी म्हटले आहे. तसेच संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक व्यापक करण्यावरही उभय नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती किरबाय यांनी दिली.

दरम्यान, पेंटॅगॉनकडून या चर्चेची माहिती दिली जात असतानाच, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्राचा भाग असलेल्या ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रावरील चीनचा दावा खोडून काढला. चीनच्या या दाव्याच्या विरोधात खडे ठाकलेल्या फिलिपाईन्स, व्हिएतनाम, ब्रुनेई व तैवान या देशांच्या मागे अमेरिका ठामपणे उभी राहाणार असल्याचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी म्हटले आहे.

याबरोबरच भारत, जपान व ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या क्वाडमध्ये अमेरिका सक्रिय भूमिका बजावणार असल्याचे संकेत परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी दिले आहेत.

leave a reply