मुस्लिम ब्रदरहूडची इजिप्तमध्ये नव्या उठावाची धमकी

- सिसी सरकारकडून ब्रदरहूडच्या दहशतवाद्यांवर कारवाई सुरूच

कैरो/इस्तंबूल – ‘इजिप्तमध्ये राष्ट्राध्यक्ष सिसी यांचे सरकार होस्नी मुबारक यांच्या राजवटीपेक्षा अधिक जुलमी आहे. या सरकारने चालविलेल्या दडपशाहीविरोधातील जनतेचा उठाव टाळता येणार नाही. इजिप्तमधील सिसी यांचे सरकार लवकरच उधळून लावले जाईल’, असा इशारा ‘मुस्लिम ब्रदरहूड’ या दहशतवादी संघटनेने दिला. गेल्या काही आठवड्यांपासून इजिप्तच्या सरकारने ब्रदरहूडचे नेते व समर्थकांची धरपकड करून ५० जणांना दहशतवाद्यांच्या यादीत टाकले आहे. या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर ब्रदरहूडने प्रतिक्रिया दिली.

इजिप्तच्या सरकारने फार आधीच ‘मुस्लिम ब्रदरहूड’ ही दहशतवादी संघटना असल्याचे घोषित केले होते. त्याचबरोबर या संघटनेच्या नेत्यांची आर्थिक कोंडी सुरू ठेवली होती. दहा दिवसांपूर्वी इजिप्तच्या न्यायालयाने ब्रदरहूडच्या तब्बल ८९ दहशतवाद्यांची खाती गोठवून व त्यांच्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश देऊन, या संघटनेच्या आर्थिक नाड्या आवळल्या होत्या. यामध्ये इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष व ब्रदरहूड संघटनेचे नेते मोहम्मद मोर्सी यांच्यासह मोहम्मद बद्दी, खैरात अल-शातेर या वरिष्ठ प्रभावी नेत्यांचा समावेश आहे. यानंतर मुस्लिम ब्रदरहूडच्या तुर्कीत आश्रय घेतलेल्या नेत्यांनी इजिप्तच्या सिसी सरकारला धमकावले आहे.

‘इजिप्तमधील राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल-सिसी यांच्या सरकारने सुरू केलेला अत्याचार फार काळ टिकणार नाही. जनतेचा संयम आणि सहनशीलतेला मर्यादा आहेत. या अत्याचाराविरोधात इजिप्तच्या रस्त्यावर पुन्हा एकदा उठाव होईल, सरकारविरोधात बंड पुकारले जाईल. मात्र कधी ते आत्ताच सांगता येणार नाही’, अशी धमकी ब्रदरहूडचा प्रवक्ता तलत फहमी याने तुर्कीतून दिली.

राष्ट्राध्यक्ष सिसी यांच्या नेतृत्वाखाली इजिप्तला भविष्य नाही. लष्कराने राष्ट्रीय कंपन्या ताब्यात घेतल्या असून उद्योजकांना तुरुंगात टाकल्याचा आरोप फहमी याने केला. होस्नी मुबारक यांच्या हुकूमशाही राजवटीपेक्षाही सिसी यांचे सरकार इजिप्तच्या जनतेवर अधिक अत्याचार करणारे असल्याचा आरोप ब्रदरहूडच्या प्रवक्त्याने केला.

त्याचबरोबर, सिसी सरकारने ब्रदरहूडचे नेते आणि कट्टरपंथी समर्थकांवर कारवाई केली असली तरी ही संघटना संपलेली नाही. आजही जगभरातील ब्रदरहूडचे नेते व समर्थक एकमेकांच्या संपर्कात असल्याचा दावा फहमी याने आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीशी बोलताना केला. ब्रदरहूडच्या प्रवक्त्याने दिलेला हा इशारा सिसी सरकारने अतिशय गांभीर्याने घेतला आहे. कारण इजिप्तवर चार दशकांहून अधिक काळ सत्ता गाजविणार्‍या होस्नी मुबारक यांची सत्ता उटलेल्या २५ जानेवारी २०११ सालच्या घटनेला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली.

अरब-इस्लामी देशांमध्ये भडकलेल्या अरब स्प्रिंगच्या काळात मुस्लिम ब्रदरहूडने इजिप्तमधील मुबारक यांची राजवट उधळली होती. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर, फहमी याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला मुलाखत देऊन जगभरातील ब्रदरहूडचे नेते व समर्थकांना पुन्हा एकदा चिथावणी दिल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करणारे विश्‍लेषक देखील ब्रदरहूडच्या इशार्‍याचे टायमिंग महत्त्वाचे असल्याचे सांगत आहेत.

दहकभरापूर्वी इजिप्तमधील मुबारक यांचे सरकार उधळून ब्रदरहूडने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली, तेव्हा अमेरिकेत बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष होते व ज्यो बायडेन उपराष्ट्राध्यक्ष होते. आता बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. त्यामुळे बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात ब्रदरहूडला नवी उभारी मिळेल व सिसी यांचे सरकार कोसळू शकते, असा दावा विश्‍लेषक करीत आहेत. दरम्यान, चार दिवसांपूर्वी ‘कैरो क्रिमिनल कोर्ट’ने या संघटनेच्या ५० जणांना दहशतवाद्यांच्या यादीत ठेवण्याची घोषणा केली. यामध्ये अब्देल मोनईम अबूल फतोह, महमूद एझात, हसन मालेक, ओमर अल-सैदी या ब्रदरहूडच्या बड्या कमांडर्सचा समावेश होता.

leave a reply