नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ बॉम्बस्फोट

नवी दिल्ली – नवी दिल्लीतील इस्रायलच्या दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाने खळबळ उडाली आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा होता व यात कुणालाही इजा झालेली नाही. इस्रायली दूतावासातील सर्व राजनैतिक अधिकारी व कर्मचारी सुखरूप आहेत. या स्फोटात काही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. या स्फोटानंतर नवी दिल्लीसह देशभरातील इस्रायली दूतावासांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा करून त्यांना या घटनेची माहिती दिली. तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी भारताच्या सुरक्षा व्यवस्थेवर विश्‍वास व्यक्त केला असून इस्रायली नागरिक भारतात सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.

सायंकाळी ५ वाजून पाच मिनिटे झाली असताना एपीजे अब्दुल कलाम रोडवर हा बॉम्बस्फोट झाला. यात कुणीही जखमी झालेले नसून हा कमी तीव्रतेचा स्फोट असल्याची माहिती दिली जाते. या स्फोटानंतर दिल्ली पोलीस व एनआयएच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणापासून जवळ असलेल्या इस्रायली दूतावासाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. नवी दिल्लीच्या विजय चौक येथे बिटिंग रिट्रिट सुरू होती, त्या ठिकाणापासून बॉम्बस्फोट झाला ते स्थळ अवघ्या दोन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. या बिटिंग रिट्रिटसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि तिन्ही संरक्षणदलांचे प्रमुख उपस्थित होेते. त्यामुळे हा बॉम्बस्फोट कमी तीव्रतेचा असला तरी सुरक्षा यंत्रणा याकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत.

भारत आणि इस्रायलच्या द्विपक्षीय संबंधांना २९ वर्षे पूर्ण होत असतानाच, झालेला हा बॉम्बस्फोट लक्षणीय ठरतो. सदर बॉम्बस्फोटानंतर, इस्रायली दूतावासातील सारे अधिकारी व कर्मचारी सुखरूप असल्याची माहिती इस्रायलच्या राजदूतांनी दिली. तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मेअर बेन शब्बात यांच्याशी चर्चा करून या स्फोटाची माहिती दिली. तसेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गाबी अ‍ॅश्केनाझी यांनी आपण हा बॉम्बस्फोट अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे म्हटले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी या बॉम्बस्फोटानंतर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेवर विश्‍वास व्यक्त केला. भारतात इस्रायली नागरिक नागरिकांना आवश्यक ती सुरक्षा पुरविली जाईल व भारतीय यंत्रणा याचा कसून तपास करतील असे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी म्हटले आहे. आपला हा संदेश भारताच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्याचे सूचना आपल्या अधिकार्‍यांना नेत्यान्याहू यांनी केल्याचे सांगितले जाते. या स्फोटानंतर मुंबईतील इस्रायली उच्चायुक्तालय व छाबड हाऊस यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

leave a reply