बायडेन प्रशासन युद्धखोर चीनसमोर शरणांगती पत्करत आहे

- अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

वॉशिंग्टन – तैवानमधील लोकशाहीवादी गटांना पाठिंबा देऊन अमेरिकेने आगीशी खेळ करू नये, असा थेट इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना दिला. त्याचबरोबर अमेरिकन सिनेटच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या विमानाने तैवानच्या हवाईहद्दीत प्रवेश केलाच तर ते पाडण्यात येईल, अशी धमकी चीनच्या मुखपत्राने दिली. तैवानच्या मुद्यावरुन चीनचे राष्ट्राध्यक्ष व सरकारी माध्यमे उघडपणे अमेरिकेला धमकावत आहेत. यामुळे खवळलेले अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन युद्धखोर चीनसमोर शरणांगती पत्करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

येत्या काही तासात अमेरिकन सिनेटच्या सभापती नॅन्सी पेलोसी पूर्व आशियाई देशांचा दौरा करणार अहेत. यामध्ये त्या दक्षिण कोरिया आणि जपानला भेट देणार असल्याचा दावा केला जातो. आपल्या या भेटीतच पेलोसी तैवानला देखील भेट देऊ शकतात, अशी माहिती अमेरिकन अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना दिली होती. पेलोसी यांच्या कार्यालयाने याबाबत कुठलेही तपशील जाहीर केलेले नाही. पण पेलोसी तैवानच्या दौऱ्यावर जाणार असतील, तर त्यांना संरक्षण पुरविण्यासाठी अमेरिकेच्या लष्कर तयारी करीत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

पेलोसी यांना अमेरिकन लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून तैवानला नेले जाईल. तसेच अमेरिकन हवाईदलाची लढाऊ विमाने पेलोसी यांना संरक्षण देतील, असे अमेरिकन अधिकाऱ्याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला सांगितले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात फोनवरुन झालेल्या चर्चेआधी ही माहिती उघड झाली होती. त्याचे पडसाद सदर चर्चेतही उमटले. चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी थेट शब्दात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना तैवानच्या मुद्यावरुन बजावले. अमेरिकेने ‘वन चायना’ धोरणाशी प्रामाणिक राहून तैवानमधील लोकशाहीवादी नेत्यांपासून दूर रहावे. अन्यथा आगीशी खेळणाऱ्यांचे हात आगीतच पोळतात, असा सज्जड इशारा जिनपिंग यांनी दिला होता.

त्यातच चीनचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने उघडपणे पेलोसी यांना तैवानच्या दौऱ्याची किंमत चुकवावी लागेल. तैवानच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या पेलोसी यांच्या हेलिकॉप्टरवर हल्ला चढविण्याची धमकी चिनी मुखपत्राच्या संपादकांनी दिली होती. चीनचे राष्ट्राध्यक्ष व त्यानंतर चिनी मुखपत्राने दिलेल्या या धमक्यांना दोन दिवस उलटले तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बोलण्याचे टाळले आहे. अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या मूक भूमिकेवर सडकून टीका केली.

‘बायडेन यांनी पेलोसी यांच्या तैवानच्या भेटीला पूर्ण समर्थन देण्याची गरज आहे. पण चीनमधील युद्धखोर आणि हुकूमशाही राजवटीच्या धमक्यांसमोर बायडेन शरणागती पत्करत आहेत. यामुळे जगभरात अमेरिकेबाबत फार चुकीचे संकेत जातील. अमेरिका कुणाच्याही प्रभावाखाली असलेला देश नाही. पेलोसी यांचा दौरा हा अमेरिका व तैवान या सार्वभौम देशांमधील मुद्दा आहे’, अशी जळजळीत टीका पॉम्पिओ यांनी केली.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय विश्लेषक देखील बायडेन यांची माघार चीनला अधिक आक्रमक करीत असल्याची टीका करीत आहेत. बायडेन यांची तैवानबाबतची भूमिका संभ्रम वाढविणारी असल्याचा दावा विश्लेषक करीतआहेत. तैवानच्या सुरक्षेला चीनकडून धोका वाढत असताना, राष्ट्राध्यक्ष बायडेन धोरणात्मक संभ्रम निर्माण करीत असल्याचे विश्लेषक निदर्शनास आणून देत आहेत.

leave a reply