राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे कट्टरवादाविरोधात आवाहन

नवी दिल्ली – ‘काहीजण देशात धर्माच्या नावाखाली वैर पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचा साऱ्या देशावर विपरित परिणाम होत असून याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरह पडसाद उमटतात. मूक प्रेक्षक म्हणून आपण हे सारे सहन करू शकत नाही. याला विरोध करण्यासाठी प्रत्येक धर्माच्याअनुयायांनी एकत्र यायला हवे आणि सारेजण या देशाचा भाग आहेत, हे ठासून सांगायला हवे’, असे आवाहन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी केले आहे.

नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोलत होते. कुठल्याही परिस्थितीत देशाच्या एकतेवर आघात होऊ देणार नाही, अशा स्वरुपाची भावना प्रबळ करणे ही काळाची गरज बनलेली आहे. प्रत्येक नागरिक या देशात सुरक्षित आहे, हा विश्वास प्रत्येकाच्या मनात बिंबविणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी संघटीत होऊन, आवाज बुलंद करून आपल्या चूका दुरूस्त करून कट्टरवादाच्या विरोधात खडे ठाकले पाहिजे. देशाची हानी ही आपल्यातल्या प्रत्येकाची हानी ठरते. म्हणूनच सर्वांनी देश सुरक्षित ठेवण्यासाठी एकजुटीने काम करायला हवे’, असा संदेश अजित डोवल यांनी दिला.

प्रत्येक धर्माने या देशाच्या विकासासाठी योगदान दिलेले आहे. देशातील वातावरण अधिक सुधारण्यासाठी प्रयत्न करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. पुढच्या पिढ्यांकड आपण कुठला भारत सोपवित आहोत, यावर सर्वांनीच विचार करायला हवा, असे सांगून यावेळी उपस्थित असलेल्या धार्मिक नेत्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी आवाहन केले. धार्मिक नेते प्रभावशाली असतात आणि त्यांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी असते, असे यावेळी डोवल म्हणाले.

कट्टरवाद व विद्वेषाच्या विरोधातील लढ्यात साथ मिळावी, यासाठी आपण सर्वांपर्यंत पोहोचायला हवे. या लढ्यात आपण प्रत्येकाला सामील करून घ्यायला हवे. आपल्या देशात कुठल्याही धर्माविरोधात विद्वेषाला थारा असू शकत नाही, हे प्रत्येकाला पटवून द्यावे लागेल, याचीही जाणीव राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी करून दिली आहे.

leave a reply