अमेरिकेचे बायडेन प्रशासन युक्रेनला आत्मघाती ड्रोन्स पुरविण्याच्या तयारीत

वॉशिंग्टन – युक्रेनसाठी अमेरिका तिसरे महायुद्ध छेडू शकत नाही. पण रशियाविरोधी युद्धासाठी अमेरिका युक्रेनला आवश्यक ते लष्करी सहाय्य पुरविल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. याबरोबर त्यांनी युक्रेनला एक अब्ज डॉलर्सचे नवे लष्करी सहाय्यही जाहीर केले होते. याच्या अंतर्गत बायडेन प्रशासन युक्रेनला स्विचब्लेड अर्थात किलर ड्रोन किंवा आत्मघाती ड्रोन्स पुरविणार आहे. हे ड्रोन्स रशियन रणगाडे आणि तोफांना लक्ष्य करू शकतील.

आत्मघाती ड्रोन्सरशियाने युक्रेनमध्ये चढविलेल्या हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की अमेरिका तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाला लष्करी सहाय्याचे आवाहन करीत आहेत. रशियाविरोधी युद्धात अमेरिका आणि नाटो थेट सहभाग घेणार नाहीत, याची जाणीव झालेल्या युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पाश्‍चिमात्य देशांसमोर शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याची यादी ठेवली होती.

यामध्ये मिग लढाऊ विमाने, रणगाडाभेदी जॅवलिन आणि स्टिंगर क्षेपणास्त्रे, हवाई सुरक्षा यंत्रणा, विनाशिकाभेदी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, सॅटेलाईट नेव्हिगेशन तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रासाठी वापरले जाणारे साहित्य यांचा समावेश होता. यापैकी कोणता व किती शस्त्रसाठा युक्रेनला पुरविला जाईल, हे स्पष्ट झालेले नाही. पण जर्मनीने काही दिवसांपूर्वी युक्रेनला स्टिंगर क्षेपणास्त्रे पुरविली होती. तर बायडेन प्रशासन देखील ‘स्विचब्लेड’ अर्थात आत्मघाती ड्रोन्स पुरविण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत.

काही दिवसांपूर्वी बायडेन प्रशासनाने युक्रेनसाठी ८० कोटी डॉलर्सचे सहाय्य घोषित केले होते. तर मंगळवारी बायडेन प्रशासनाने अतिरिक्त १३.६ अब्ज डॉलर्सचे सहाय्य जाहीर केले. यामध्ये एक अब्ज डॉलर्सच्या लष्करी सहाय्याचा समावेश आहे. याअंतर्गत बायडेन प्रशासन युक्रेनला एरोवायरॉंमेंट कंपनीचे ‘स्विचब्लेड’ अर्थात आत्मघाती ड्रोन्स पुरविण्याच्या तयारीत आहेत. वजनाला हलके आणि स्वस्त असणारे हे ड्रोन्स युक्रेनच्या लष्कराची आवश्यकता पूर्ण करतील, असा विश्‍वास अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

११५ मैल प्रतितास वेगाने उडणारे हे ड्रोन्स ४० मिनिटे उड्डाण करू शकतात व शत्रूचे रणगाडे, तोफा किंवा चिलखती लष्करीवाहनांवर हल्ले चढवू शकतात. अमेरिकेने आत्तापर्यंत या ड्रोन्सचा वापर अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी कारवायांसाठी केला होता. पण बायडेन प्रशासनाने युक्रेनला हे ड्रोन्स पुरविले तर पहिल्यांदाच अफगाणिस्तानबाहेरील प्रत्यक्ष युद्धात या ड्रोन्सचा वापर होईल.

सध्या युक्रेनचे लष्कर रशियन रणगाड्यांविरोधात तुर्कीनिर्मित बयरक्तार ड्रोन्सचा वापर करीत आहे. युक्रेनने या युद्धात अमेरिकेच्या स्विचब्लेड ड्रोन्सचा वापर केलाच, तर त्यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते.

leave a reply