नाटोकडून आर्क्टिक क्षेत्रातील सर्वात मोठा युद्धसराव सुरू

सर्वात मोठा युद्धसरावऑस्लो/ब्रुसेल्स – रशियाकडून युक्रेनवरील हल्ल्यांची तीव्रता वाढत असतानाच नाटोने नॉर्वेत व्यापक युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘कोल्ड रिस्पॉन्स २०२२’ असे या सरावाचे नाव असून त्यात ३० देशांचे सुमारे ३५ हजार जवान सहभागी झाले आहेत. हा सराव सुरू असतानाच ब्रुसेल्समध्ये नाटोची बैठक सुरू झाली असून पूर्व युरोपात ४० हजार जवानांना ‘रॅपिड रिस्पॉन्स फोर्स’चा भाग म्हणून हाय अलर्टवर तैनात करण्यात आल्याचे नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी जाहीर केले.

सर्वात मोठा युद्धसरावरशिया-युक्रेन युद्धाला तीन आठवडे पूर्ण होत असून गेल्या काही दिवसात रशियाचे युक्रेनमधील हल्ले अधिक तीव्र होताना दिसत आहेत. हल्ल्यांची व्याप्ती वाढत असतानाच अमेरिका व नाटोने युक्रेनला मोठ्या प्रमाणात संरक्षणसहाय्य पुरविले आहे. अमेरिकेसह नाटोचे सदस्य देश युक्रेनला सातत्याने शस्त्रास्त्रांचा पुरवठा करीत आहेत. दुसर्‍या बाजूला रशियाचे शेजारी देश असलेल्या पूर्व युरोपिय देशांमध्ये लष्करी तैनातीही वाढविण्यात आली आहे. रशियावर दडपण आणण्यासाठी अमेरिका व नाटो वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करीत असून नॉर्वेतील नवा सरावही त्याचाच भाग ठरतो.

सर्वात मोठा युद्धसरावनॉर्वे हा रशियन सीमेला जोडलेला देश असल्याने नाटोचा या देशातील सराव लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. या सरावात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससह नाटोचे २८ सदस्य देश तसेच स्वीडन व फिनलंडसारले सदस्य नसलेले देश ही सहभागी झाले आहेत. सरावात ३५ हजार जवानांसह २०० विमाने व ५० युद्धनौका व पाणबुड्या सामील झाल्या आहेत. ब्रिटनने आपली विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस एलिझाबेथ’ या सरावासाठी तैनात केली असून ९०० रॉयल मरिन्सची तुकडीही पाठविली आहे.

सर्वात मोठा युद्धसराव‘कोल्ड रिस्पॉन्स २०२२’ हा सुरक्षेच्या दृष्टिने आयोजित करण्यात आलेला सराव आहे. ती आक्रमक हेतूने आखलेली लष्करी मोहीम नाही’, असा खुलासा नाटोने केला आहे. रशियन सीमेला जोडून असलेल्या देशात सरावाचे आयोजन करण्यात आल्याने हा सराव लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. आर्क्टिक क्षेत्रात नाटोने आयोजित केलेला हा सर्वात मोठा युद्धसराव असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, युद्धसराव सुरू असतानाच ब्रुसेल्समध्ये नाटोची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नाटोेने युरोपमधील आपली तैनाती व योजना अधिक आक्रमक करण्याचे संकेत दिले आहेत. ‘पूर्व युरोपमध्ये नाटोच्या नेतृत्त्वाखाली सुमारे ४० हजार जवान तैनात आहेत. तर अमेरिकेचे एक लाख जवान युरोपिय देशांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. ही तैनाती स्पष्ट संदेश देणारी आहे. नाटोच्या सदस्य देशावर हल्ला झाला तर नाटो पूर्ण व निर्णायक क्षमतेने प्रत्युत्तर देईल’, असे नाटोचे महासचिव जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी बजावले.

leave a reply