मुंद्रा बंदरात पकडण्यात आलेल्या ड्रग्जचा पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंध

-* ‘एनआयए`च्या आरोपपत्रातील माहिती * आणखी काही जणांच्या अटकेची शक्यता

नवी दिल्ली – गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात गुजरातच्या मुंद्रा बंदरात एका कंटेनरमधून तब्बल 21 हजार कोटी रुपयांचा ड्रग्जसाठा पकडण्यात आला होता. यामुळे देशभरात खळबळ माजली होती. या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अमली पदार्थांच्या तस्करीचा संबंध हा पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी असल्याचे ‘एनआयए`ने म्हटले आहे. तसेच या प्रकरणात ‘एनआयए` सध्या पंजाबमध्ये लक्ष केंद्रित केल्याची बातमी आहे. हा साठा अखेरीस पंजाबमध्ये पोहोचणार होता. या तस्करीमध्ये पंजाबमधील काही जण सहभागी असल्याचा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.

अफगाणिस्तानातून इराणमार्गे आयात करण्यात आलेल्या टॅल्कम पावडरच्या खड्यांच्या नावाखाली हेरॉईनची तस्करीचा डाव गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात उधळण्यात आला होता. डायरोक्टरेट ऑफ रिव्हेन्यू इंटिलेजन्सला (डीआरआय) याबाबत खात्रिलायक माहिती मिळाल्यावर मुंद्रा पोर्टमध्ये छापा टाकून अफगाणिस्तानातून आलेल्या कंटेनरमधून तीन हजार कोटी हेरॉईन पकडण्यात आले होते. त्यावेळी देशभरात खळबळ माजली होती. या अमली पदार्थाच्या मूल्याचा विचार करता हा देशातील आतापर्यंत एकाचवेळी जप्त करण्यात आलेला अमली पदार्थांचा साठा होता. यामागे टेरर फंडिंगची शक्यता समोर आल्यानंतर या प्रकरणाचा तपास ‘एनआयए`कडे सुपूर्द करण्यात आला होता.

एनआयए`ने यासंदर्भात आरोपपत्र दाखल केले अहे. एकूण 16 जणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यातील 10 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सहा जण अफगाणी नागरिक आहेत, तर चार जण भारतीय आहेत. तसेच फरार असलेल्यांमध्ये पाच अफगाणी असून एक इराणी असल्याचे आरोपपत्रातून स्पष्ट होते.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये ज्या कंपनीच्या नावे टॅल्कम पावडरच्या नावाखाली या हेरॉईनची तस्करी झाली होती त्याचा मालक एम. सुधाकर, त्याची पत्नी दुर्गा वैशाली, तमिळनाडूच्या कोईम्बूतर येथील राजकूमार पेरुमल या तीन भारतीयांचा समावेश आहे. राजकुमार पेरुमलची यामधील भूमिका महत्त्वाची आहे. राजकुमारने याआधी जूनमध्येही अशी तस्करी केली होती. यासाठी त्याला एम. सुधारकरने पैशाची मदत केली होती.

तर फरार आरोपींमध्ये मोहम्मद हसन दाद, हसन दाद, अब्दुल हदी अलीजादा, इस्मत इलाह हनोरी, नाजाबुल्ला खान हे अफगाणी, जावेद नजाफी हा इराणी नागरिक आहे. यातील मोहम्मद दाद व हसन दाद याची अफगाणिस्तानातील कंधहारमध्ये कंपनी असून या कंपनीद्वारेच हा माल आयात करण्यात आला होता. या मोहम्मद दाद व हसन दादचे संबंध पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी आहे. आरोपपत्रात पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचे नाव उघड करण्यात आलेले नाही. मात्र भारतात हा माल विकून त्यातून मिळालेला पैसा अवैध मार्गाने देशाबाहेर पाठविण्यात येत होता व तेथे त्याचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी केला जात होता, असा दावा करण्यात आला आहे. याआधी दिल्ली, पंजाबमध्ये काही प्रकरणात पकडण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये असे टॅल्कम पावडरच्या खडे सदृश्‍य हेरॉईन सापडले होते. त्यामुळे याआधी भारतात अशा प्रकारची तस्करी झाली होती व त्याचा संबंध मुंद्रा पोर्टमध्ये सापडलेल्या अमली पदार्थांची जोडून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. पंजाबमधील काही जण ‘एनआयए`च्या रडारवर असल्याची बातमी येत आहे. मुंद्रा पोर्टमध्ये उतरविण्यात आलेला अमली पदार्थांचा साठाही सर्वात शेवटी पंजाबमध्येच पोहोचविला जाणार होता. त्यामुळे ‘एनआयए`ने या प्रकरणात पंजाबमध्ये लक्ष केंद्रित केल्याची माहिती या वृत्तात देण्यात आली आहे. या प्रकरणात येत्या काही दिवसात आणखी काही जणांना अटक होईल, अशी शक्यताही या वृत्त अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

leave a reply