अमेरिकेतील बायडेन प्रशासनाकडून ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’ला मुदतवाढीचा प्रस्ताव

- रशियाकडून प्रस्तावाचे स्वागत

वॉशिंग्टन/मॉस्को – अमेरिका व रशियातील अण्वस्त्रांची संख्या मर्यादित करण्यासंदर्भात झालेल्या ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’ला पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील नव्या बायडेन प्रशासनाने ठेवला आहे. अमेरिकेच्या या प्रस्तावाचे रशियाने स्वागत केले असून, रशिया मुदतवाढीसाठी तयार आहे अशी प्रतिक्रिया रशियन प्रवक्त्याने दिली. २०१० साली झालेल्या या कराराची मुदत पुढील महिन्यात संपणार होती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुदतवाढ तसेच नव्या कराराची शक्यता फेटाळली होती.

‘न्यू स्टार्ट ट्रिटीमध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींनुसार कराराला पाच वर्षे मुदतवाढ देण्याची अमेरिकेची इच्छा आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हा करार अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टिने महत्त्वाचा असल्याची भूमिका मांडली आहे. अमेरिकेचे हितसंबंध राखण्यासाठी आम्ही रशियाबरोबर सहकार्य करणार असलो तरी त्याचवेळी रशियाच्या बेदरकार व आक्रमक कारवायांना विरोध केला जाईल’, असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन प्साकि यांनी सांगितले. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनीही याला दुजोरा दिला आहे.

‘न्यू स्टार्ट ट्रिटी’ आहे त्या स्वरुपात सक्रिय राहणे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिने महत्त्वाचे आहे, असे किर्बी यांनी स्पष्ट केले. या कराराला मुदतवाढ मिळाली नाही तर रशियाच्या अण्वस्त्रांवर लक्ष ठेवण्याची संधी गमवावी लागेल, असेही संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी बजावले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी एप्रिल २०१०मध्ये ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’वर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’नुसार दोन्ही देश १,५५०हून अधिक अण्वस्त्रे तैनात करु शकत नाहीत. त्याचवेळी परस्परांच्या अण्वस्त्रतळांची पाहणी करण्याच्या तरतुदीचाही करारात समावेश होता.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनी ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’च्या नव्या स्वरुपात चीनचाही समावेश हवा, अशी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र चीनने अमेरिकेची मागणी स्पष्ट शब्दात फेटाळून लावली होती. अमेरिका व रशियाकडे आपल्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक अण्वस्त्रे असल्याचे सांगून चीनने करारात सहभागी होण्यास नकार दिला होता.

leave a reply