‘ईस्ट चायना सी’ क्षेत्रात चीनविरोधात जपानला अमेरिकेचे सहकार्य अपेक्षित

हाँगकाँग – ‘ईस्ट चायना सी’मधील चीनच्या आक्रमकतेविरोधात जपानला अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडून सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन जपानने केले आहे. बायडेन यांनी नियुक्त केलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवॅन आणि जपानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिगेरू कितामूरा यांच्यात याविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘ईस्ट चायना सी’मधील सेंकाकूच्या द्विपसमुहाच्या क्षेत्रात चीनच्या जहाजांनी घुसखोरी केली होती. जपानच्या तटरक्षकदलाच्या जहाजांनी वेळीच कारवाई करून चीनच्या जहाजांना पिटाळून लावले होते.

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या शपथग्रहण समारंभासाठी जपानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिगेरू कितामूरा उपस्थित होते. बायडेन यांच्या शपथग्रहणानंतर कितामूरा आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नियुक्त सुलिवॅन यांच्यात ईस्ट चायना सीच्या मुद्यांवर चर्चा झाल्याचा दावा केला जातो. हाँगकाँगस्थित दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, कितामूरा यांनी ‘ईस्ट चायना सी’मधील चीनची आक्रमकतेला रोखण्यासाठी बायडेन प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुलिवॅन यांनी देखील जपान व अमेरिकेत झालेल्या संरक्षणविषयक करारानुसार, बायडेन प्रशासन जपानच्या सुरक्षेसाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर जपानच्या सार्वभौमत्त्वाला धोकादायक ठरणार्‍या कोणत्याही एकतर्फी कारवाईला अमेरिका विरोध करील, असे सुलिवॅन म्हणाले.

याआधी नोव्हेंबर महिन्यातही जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी बायडेन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतही ‘ईस्ट चायना सी’ व सेंकाकू द्विपसमुहांचा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा बायडेन यांनी देखील सुरक्षेच्या मुद्यांवर जपानला आश्‍वस्त केले होते. पण अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या चीनबाबतच्या भूमिकेविषयी जपानमधील लष्करी विश्‍लेषक साशंकता व्यक्त करीत आहेत.

चीनकडून जपानच्या सार्वभौमत्त्वाला असलेला धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चीनच्या गस्तीनौकांकडून जपानच्या सागरी हद्दीत सुरू असणारी घुसखोरी थांबलेली नाही. याआधी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात कठोर भूमिका स्वीकारली होती. पण अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बायडेन चीनविरोधात तितकी कठोर भूमिका स्वीकारणार नसल्याची शक्यता जपानचे लष्करी विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातील सागरी तसेच हवाई प्रवासावर चीनकडून इतर देशांना आडकाठी केली जात आहे. चीनची ही कारवाई संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांच्या विरोधात असल्याची जळजळीत टीका जपानने संयुक्त राष्ट्रसंघाकडे केली आहे.

leave a reply