रशिया इराणच्या अणुकार्यक्रमाला सहाय्य करू शकतो

- अमेरिकन गुप्तचर विभागाच्या माजी अधिकाऱ्याचा दावा

अणुकार्यक्रमाला सहाय्यवॉशिंग्टन – युक्रेनमधील युद्धामुळे येत्या काळात इराण व रशियामध्ये नवे सहकार्य प्रस्थापित होऊ शकते. इराणने या युद्धात रशियाला लष्करी सहाय्य पुरविले होते. याच्या मोबदल्यात रशिया इराणला अणुकार्यक्रमाचा वेग वाढविण्यासाठी सहाय्य करू शकतो, असा इशारा अमेरिकन गुप्तचर विभागाच्या माजी अधिकाऱ्याने दिला.

अणुकार्यक्रमाला सहाय्यगेल्या काही आठवड्यांपासून युक्रेनची राजधानी किव्हपासून प्रमुख शहरांवर रशियन लष्कर जोरदार ड्रोन व क्षेपणास्त्रांचे हल्ले चढवित आहे. यातील ड्रोन हल्ल्यांनी युक्रेनमधील पायाभूत सुविधांचे जबरदस्त नुकसान केले असून वीजपुरवठा देखील बाधित झाल्याचा दावा केला जातो. या हल्ल्यांसाठी रशियाने इराणी बनावटीच्या आत्मघाती ड्रोन्सचा वापर केल्याचा आरोप युक्रेन व पाश्चिमात्य देशांनी केला होता. युक्रेनच्या लष्कराने हल्ल्यात वापरल्या गेलेल्या इराणी ड्रोनच्या उद्ध्वस्त झालेल्या भागाचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होते. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या माजी अधिकाऱ्याने ब्रिटीश दैनिकाशी बोलताना इराण व रशियातील या लष्करी सहकार्याबाबत नवा इशारा दिला.

युक्रेनमधील युद्धात ड्रोन्स पुरविणाऱ्या इराणला रशिया येत्या काळात मोठे सहाय्य करू शकतो, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. रशिया व इराण या दोन्ही देशांवर अमेरिका व युरोपिय महासंघाने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे इराणला आर्थिक स्वरुपात सहाय्य करताना रशियावर मर्यादा येऊ शकतात. हे ओळखून रशिया इराणच्या अणुकार्यक्रमाला सहाय्य करू शकतो, असा दावा या अधिकाऱ्याने केला. रशिया याआधीच इराणला अणुप्रकल्पांच्या निर्मितीत सहाय्य करीत असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्याने लक्षात आणून दिले. काही आठवड्यांपूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांनी देखील रशियावर असाच आरोप केला होता.

दरम्यान, युक्रेनच्या युद्धात रशियाला ड्रोन्स पुरविल्याचे पाश्चिमात्य देशांचे आरोप इराणने फेटाळले आहेत. अमेरिकेने देखील या छुप्या सहकार्याबाबत ठोस पुरावे नसल्याचे म्हटले होते, याची आठवण इराणने दोन दिवसांपूर्वीच करुन दिली.

leave a reply