राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या मुलाच्या परदेशी व्यवहारांच्या चौकशीला वेग

- अमेरिकी संसदेत पुरावे सादर

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन यांनी देशाच्या हितसंबंधांना ‘कॉम्प्रमाईज’ करून (चीनशी हातमिळवणी) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुरू झालेल्या चौकशीला वेग आला आहे. अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे संसद सदस्य मॅट गेट्झ यांनी संसदेत हंटर बायडेन यांच्या लॅपटॉपमधील हार्ड ड्राईव्हची कॉपी असणारी ‘एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह’ सादर केली. ही हार्ड ड्राईव्ह संसदेत पुरावा म्हणून दाखल करून घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चौकशीला वेगज्यो बायडेन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष असताना त्यांचा मुलगा हंटर बायडेन यांनी विविध कंपन्या स्थापन करून परदेशी कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. यात प्रामुख्याने चिनी कंपन्यांचा समावेश आहे. या गुंतवणुकीच्या बदल्यात उपराष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी चीनच्या कलाने धोरण राबवून अनेक निर्णय घेतल्याचे मानले जाते. हंटर बायडेन व त्याच्या परिवाराला मोठा आर्थिक फायदा झाल्याचे दावेही करण्यात आले. याप्रकरणी २०१८ साली डेलावेअर प्रांतातील सरकारी वकिलांनी चौकशी सुरू केली होती.

मात्र या चौकशीची गती अतिशय संथ होती. २०१९ साली हंटर बायडेन यांचा लॅपटॉप मिळाल्यानंतर त्यांच्याविरोधातील चौकशीला वेग येईल, असे मानले जात होते. मात्र त्या लॅपटॉपमधून काहीच माहिती मिळाली नसल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा तसेच तपासयंत्रणांमधील अधिकार्‍यांनी केला. २०२० साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी हंटर बायडेन यांचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र गुप्तचर यंत्रणा तसेच तपासयंत्रणांनी सदर लॅपटॉप व त्यातील माहिती रशियन कटाचा भाग असल्याचा दावा केला होता. अमेरिकेतील आघाडीच्या माध्यमांनीही हंटर बायडेन यांच्याविरोधात करण्यात आलेले दावे फेटाळले होते.

चौकशीला वेगमात्र आता त्यासंदर्भातील अधिक माहिती समोर येण्यास सुरुवात झाली असून अनेक साक्षीदार पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे डेलावेअरमधील सरकारी वकिलाच्या चौकशीबरोबरच ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’, ‘इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिस’ व न्याय विभागानेही हंटर बायडेन यांची चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत. संसद सदस्य मॅट गेट्झ यांनी संसदेत सादर केलेल्या पुराव्यामुळे अमेरिकी संसदेलाही याची दखल घ्यावी लागेल, असा दावा करण्यात आला आहे. या सर्व घटनाक्रमामुळे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रतिमा अधिकच धुळीस मिळू शकते व त्याचा फटका डेमोक्रॅट पक्षालाही बसेल, असे विश्‍लेषकांकडून सांगण्यात येत आहे.

यापूर्वी, हंटर बायडेन यांची युक्रेनमध्ये अवैध गुंतवणूक असल्याचे आरोप माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रुडी ग्युलियानी यांनी केला होता. हंटर बायडेन यांचा लॅपटॉप ताब्यात घेण्याची मागणीही ग्युलियानी यांनी केली होती.

leave a reply