इस्रायल व कुर्दांच्या गॅस पाईपलाईनला लक्ष्य करण्यासाठी इराणने इराकमध्ये क्षेपणास्त्र हल्ले चढविले होते

- इराकी आणि तुर्की अधिकार्‍यांची माहिती

गॅस पाईपलाईनबगदाद/अंकारा – दोन आठवड्यांपूर्वी इराणने इराकच्या कुर्दिस्तान प्रांतात १२ क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्याद्वारे इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या सिक्रेट तळाला लक्ष्य केल्याचा दावा इराणने केला होता. पण आर्थिक व व्यापारी हितसंबंध धोक्यात येत असल्यामुळे इराणने ही कारवाई केल्याचे समोर येत आहे. इराकच्या कुर्दिस्तानातून तुर्कीमार्गे युरोपपर्यंत गॅस पाईपलाईन टाकण्याच्या इस्रायलच्या प्रयत्नांना हादरा देण्यासाठी इराणने हेे हल्ले चढविले होते. इराकी आणि तुर्की अधिकार्‍यांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून युरोपिय देशांसमोरील इंधनाचे संकट वाढत चालले आहे. आतापर्यंत युरोपिय देशांना रशियाकडून युक्रेनमार्गे इंधन पुरवठा केला जात होता. पण या युद्धामुळे युरोपिय देशांचा इंधनाचा पुरवठा धोक्यात सापडला आहे. या पार्श्‍वभूमीवर युरोपिय देश आपली इंधनाची गरज भागविण्यासाठी आखातातील इंधनसंपन्न देशांबरोबर चर्चा करीत आहेत. पण इराकच्या कुर्दिस्तान प्रांतातील हल्ल्यानंतर याबाबतची अधिक माहिती उघड झाली.

इराकी आणि तुर्कीच्या अधिकार्‍यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर या हल्ल्याबाबत ही माहिती दिली. अमेरिकेच्या मित्रदेशांना इशारा देण्यासाठी इराणने कुर्दिस्तानच्या इरबिलमध्ये क्षेपणास्त्र हल्ले चढविले. १३ मार्च रोजी इरबिलमधील इस्रायलच्या गोपनीय ठिकाणावर कारवाई केल्याचे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी जाहीर केले. पण इराणने इस्रायली ठिकाणावर नाही, तर ‘बाझ करीम बर्झान्जी’ या कुर्द उद्योजकाच्या आलिशान निवासस्थानावर हल्ला चढविला होता, असा दावा इराकी अधिकार्‍यांनी केला.

काही दिवसांपूर्वी बर्झान्जी यांच्या याच व्हिलामध्ये अमेरिका व इस्रायली अधिकार्‍यांमध्ये दोन बैठका पार पडल्या होत्या. यामध्ये कुर्दिस्तानातील इंधनवायू पाईपलाईनच्या सहाय्याने तुर्कीमार्गे युरोपला पुरविण्याबाबत चर्चा झाली होती. या बैठकीत बर्झान्जी देखील सहभागी झाले होते, असे इराकी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. तुर्कीच्या अधिकार्‍यांनी देखील अमेरिका व इस्रायलमध्ये अशी चर्चा पार पडल्याचे मान्य केले.

आपल्या भूभागात अमेरिका व इस्रायली अधिकार्‍यांमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचे कुर्दिस्तानच्या सरकारने म्हटले आहे. तर इराणने यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मात्र इराणी सुरक्षा विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकार्‍याने याबाबत बोलताना इस्रायलला इशारा दिला. ‘इरबिलमधील हल्ला हा अनेकजणांसाठी सुस्पष्ट संदेश होता. इराण व इराणच्या शेजारी देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रापासून ते कृषी क्षेत्रापर्यंत तुम्ही काहीही करायचे ठरविले तरी ते प्रत्यक्षात उतरू दिले जाणार नाही’, अशी धमकी या इराणी अधिकार्‍याने दिली.

इराक व सिरियासह या क्षेत्रातील कुर्दवंशिय स्वतंत्र कुर्दिस्तानच्या निर्मितीसाठी प्रयत्न करीत असून हा आपला अधिकार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी इस्रायलने आपल्याला सहाय्य करावे, अशी अपेक्षा कुर्द नेत्यांनी अनेकवार व्यक्त केली होती. त्यांना इस्रायलकडून प्रतिसाद मिळत आहे. इराकच्या कुर्दिस्तान या स्वायत्त प्रांतातील इंधन इस्रायलला मिळत होते. सध्या युक्रेनमधील युद्धामुळे इस्रायलबरोबरील कुर्दांचे हे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. थेट युरोपला इंधनाचा पुरवठा करण्याची इस्रायल तसेच कुर्दवंशियांचे प्रयत्न कधीही यशस्वी ठरू देणार नाही, हे इराणने दोन आठवड्यांपूर्वी चढविलेल्या हल्ल्याद्वारे दाखवून दिल्याचे दिसत आहे.

leave a reply