चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’ला मोठा धक्का – ‘डब्ल्यूएचओ’तील सहभागासाठी तैवानला मिळणाऱ्या समर्थनात वाढ

पॅरिस/वॉशिंग्टन – ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या (डब्ल्यूएचओ) सर्वसाधारण बैठकीत तैवानला सहभागी करुन घेण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, युरोपिय महासंघ, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तसेच लॅटीन अमेरिकी देशांनी पाठिंबा जाहीर केला. तर फ्रान्सने चीनचा विरोध झुगारुन तैवानला लष्करी सहाय्य पुरविण्याची घोषणा केली आहे. अमेरिका व इतर देशांकडून तैवानला मिळणारा राजनैतिक आणि लष्करी पाठिंबा चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’ला मिळालेला जबरदस्त हादरा ठरतो. तैवान हा आपला भूभाग असून तो स्वतंत्र देश नसल्याची चीनची भूमिका आहे व ही भूमिका चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’चा महत्त्वाचा भाग ठरते. त्याला मिळालेला धक्का चीनचा प्रभाव ओसरत चालल्याचे संकेत देत आहे.

पुढच्या सोमवारी आणि मंगळवारी ‘डब्ल्यूएचओ’ची ‘वर्ल्ड हेल्थ असेंबली’ आयोजित करण्यात आली आहे. कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर ब्रुसेल्स येथे पार पडणाऱ्या या बैठकीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीसारखे सर्व देश तसेच संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होतात. यावर्षीपासून सदर बैठकीत तैवानला देखील सहभागी करुन घ्यावे, अशी मागणी जोर पकडू लागली आहे. कोरोनाव्हायरसच्या विरोधातील लढ्यात तैवानची भूमिका महत्त्वाची असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडबरोबर युरोपिय महासंघाच्या सदस्यांनी देखील तैवानला सदर बैठकीत सहभागी करण्याची मागणी केली आहे. तर गेल्या वर्षाच्या अखेरीस स्थापन झालेल्या ‘फॉरमोसा क्लब’ या दहा लॅटीन अमेरिकी देशांच्या संघटनेने देखील ‘डब्ल्यूएचओ’कडे तशी लेखी शिफारस केली आहे.

पण चीनधार्जिणी भूमिका स्वीकारल्याचे आरोप होत असलेल्या ‘डब्ल्यूएचओ’ने तैवानच्या सहभागाला मंजुरी दिलेली नाही. प्रमुख सदस्य देशांकडून पूर्ण समर्थन मिळाल्याखेरीज तैवानला सहभागी करुन घेता असणार नसल्याचे कारण ‘डब्ल्यूएचओ’ने पुढे केले आहे. मात्र डब्ल्यूएचओ निष्पक्ष भूमिका स्वीकारत नसल्याची टीका तैवानने केली आहे. चीनने तैवानच्या सहभागावर आक्षेप घेतला आहे. तैवान हा चीनचाच भूभाग असल्याचे मान्य केले तरच ‘डब्ल्यूएचओ’च्या बैठकीत चीनचा भाग म्हणून तैवानला स्थान मिळेल, अशी शर्त चीनने ठेवली आहे. पण तैवानने चीनची ही शर्त धुडकावून लावली. तैवान चीनचा भूभाग कधीच नव्हता, त्यामुळे आधार नसलेल्या गोष्टी मान्य करण्यात काहीच अर्थ नाही, अशा शब्दात तैवानने चीनला फटकारले आहे.

चीनच्या विरोधात उभ्या राहिलेल्या या राजनैतिक आघाडीबरोबर लष्करी आघाडी देखील आकार घेत आहे. फ्रान्सने तैवानला लष्करी साहित्यांचा पुरवठा करण्याचे संकेत दिले आहेत. तैवानच्या युद्धनौकांवर तैनात क्षेपणास्त्रांच्या अद्ययावतीकरणासाठी फ्रान्स देत असलेल्या सहाय्यावर चीनने आक्षेप घेतला होता. तसेच या लष्करी सहकार्यामुळे चीनचे फ्रान्सबरोबरील संबंध बिघडतील, असा इशारा चीनने दिला होता. पण फ्रान्सने चीनचा हा इशारा धुडकावला असून चीनने कोरोनाविरोधी संघर्षावर लक्ष केन्द्रीत करावे, असा टोला फ्रान्सने लगावला आहे.

याआधी तैवानच्या आखातात आपल्या नौदलाच्या युद्धनौका पाठवून तसेच तैवानच्या हवाई क्षेत्रात लढाऊ विमानांची घुसखोरी घडवून चीनने या तैवानवरील लष्करी दडपण वाढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अमेरिकेने याची गंभीर दखल घेतली असून आपल्या युद्धनौकांचीही गस्त या क्षेत्रात सुरू केली होती. आपल्या सामर्थ्याचा वापर करून चीन तैवानला धमकाऊ शकत नाही असा संदेश अमेरिकेकडून दिला जात आहे. आता फ्रान्सने देखील तैवानबरोबर लष्करी सहकार्य सुरू करून चीनविरोधी आघाडी अधिकच बळकट झाल्याचे दाखवून दिले आहे.

leave a reply