देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८५ हजारांवर

नवी दिल्ली/ मुंबई – देशात २५ मार्च पासून सुरु असलेल्या लॉकडाऊनला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. लॉकडाऊनचा चौथा टप्पा लागू होत असताना देशात कोरोनाव्हायरसमुळे दागवलेल्यांची संख्या २७००वर पोहोचली असून एकूण रुग्णांची संख्या ८५ हजारांच्या पुढे गेली आहे. या साथीची लागण झालेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३४.६ टक्क्यांवर पोहोचल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे, मात्र त्याचवेळी काही शहरे आणि जिल्ह्यांमध्ये या साथीच्या रुग्णांच्या संख्येत झालेली मोठी वाढ चिंताजनक ठरत आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात या साथीने ४९ जण दगावले, तर चोवीस तासात १,५७६ रुग्ण आढळले. मुंबईत ३४ जणांचा बळी गेला, तर ९३३ नव्या रुग्णांची नोंद झाली.

गुरुवार सकाळपासून शुक्रवारच्या सकाळपर्यंत देशात कोरोनाच्या साथीमुळे १०० जण दगावले, तर ३९६७ नव्या रुग्णांची नोंद झाली, असल्याची माहिती आरोग्य विभागाने जाहीर केली. मात्र यामध्ये शुक्रवारी दिवसभरात झालेल्या रुग्ण नोंदीचा समावेश नाही. त्यामुळे प्रत्यक्षात शुक्रवारी रात्रीपर्यंत रुग्णांची संख्या ८५ हजारांच्याही पुढे गेली आहे. गेल्या दोन दिवसात देशभरात या साथीच्या रुग्णांची संख्या ६५०० पेक्षा अधिकने वाढली आहे. गेल्या २० दिवसात देशातील कोरोनाचे रुग्ण तिप्पट झाले आहेत. २५ एप्रिल रोजी देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या २७००० इतकी होती, ती आता ८५ हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेशमध्ये झाली आहे.

महाराष्ट्रातील या साथीच्या रुग्णांची संख्या २९,१०० वर पोहोचली आहे. तसेच या साथीच्या बळींची संख्या १,०६८ झाली आहे. पुण्यात १९७ नवे रुग्ण आढळले. मुंबई, पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांमध्येच आतापर्यंत राज्यातील ८५ टक्के रुग्ण आढळले आहेत. या तीन जिल्ह्यात २४ हजाराहून जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. या तीन जिल्ह्यांबरोबर राज्यातील औरंगाबाद जिल्हा सर्वात मोठा हॉटस्पॉट म्हणून समोर आला आहे. औरंगाबादमधील या साथीच्या रुग्णांची संख्या ८०० च्या पुढे गेली आहे. देशात आढळलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ३३ टक्के रुग्ण महाराष्ट्रातच आढळले असून देशातील २० टक्के रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. याआधी गुरुवारी राज्यात एका दिवसातच ५४ जण दगावले होते, तर १६०२ नवे रुग्ण आढळले. यापैकी महामुंबईत परिक्षेत्रातच ४६ जण दगावले होते. तसेच चोवीस तासात ९९८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात कोरोनाचे इतके रुग्ण सापडण्याचा हा राज्यातील उच्चांक होता.

दिल्लीत चोवीस तासात कोरोनाच्या ९ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ४२७ नवे रुग्ण आढळले. दिल्लीत एका दिवसात आढळलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरते. यामुळे दिल्लीतील रुग्णांची संख्या ८००० पुढे पोहोचली आहे. दिल्लीतील लष्कराच्या मुख्यालयात तैनात एका जवानाला कोरोनाची लागण झाल्यानंतर या मुख्यालयातील काही भाग बंद करण्यात आला आहे. गुजरातमध्ये ३२४ नवे रुग्ण आढळले असून या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ९५९१ वर पोहोचली आहे. राज्यस्थानात आतापर्यंत ४,५८९ रुग्णाची नोंद झाली आहे.

leave a reply