इराण व कतारमध्ये द्विपक्षीय सहकार्य करार संपन्न

दोहा – इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी कतारच्या दौर्‍यावर असून त्यांनी इंधनगॅस विषयक सहकार्य करार केला. गेल्या अकरा वर्षांमध्ये इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी कतारचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ ठरते. आखाती देशांबरोबर संबंध सुधारण्याच्या इराद्याने इराणचे राष्ट्राध्यक्ष कतारमध्ये दाखल झाल्याचा दावा स्थानिक माध्यमिक करीत आहेत. तर कतारच्या राष्ट्रप्रमुखांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला होता. त्या पार्श्वभूमीवर इराण आणि कतारच्या राष्ट्रप्रमुखांमधील या भेटीचे महत्त्व वाढले आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी सोमवारी कतारची राजधानी दोहामध्ये दाखल झाले. दोन दिवसांच्या दौर्‍यावर असलेल्या इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी कतारचे राष्ट्रप्रमुख शेख तमिम बिन हमाद अल-थानी यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये इंधनगॅस सहकार्य पार पडला. त्याचबरोबर व्यापार, ऊर्जा, शिक्षण, संस्कृती, प्रवासी वाहतूक अशा चौदा वेगवेगळ्या सामंजस्य करारांवरही स्वाक्षर्‍या झाल्याचे दोन्ही देशांच्या माध्यमांनी म्हटले आहे. मंगळवारी दोहामध्ये आयोजित इंधनगॅस निर्यातदारांच्या बैठकीतही राष्ट्राध्यक्ष रईसी सहभागी होणार आहेत.

इराण आणि कतार मध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. २०१७ साली दहशतवादी संघटनांची पाठराखण केल्याचा आरोप करून सौदी अरेबिया आणि अरब मित्र देशांनी कतारवर बहिष्कार टाकला होता. तेव्हा इराणनेच कतारबरोबरचे सहकार्य सुरू ठेवले होते. तर येमेनमधील हौथी बंडखोरांबाबतच्या इराणच्या भूमिकेचे कतारने समर्थन केले होते. अशा परिस्थितीत इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हा दौरा उभय देशांमधील सहकार्य दृढ करण्यासाठी असल्याचे दिसत आहे. पण अरब देशांबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करणार्‍या इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी कतारपासून आपल्या दौर्‍याची सुरुवात केल्याचे, इराणी आणि कतारी माध्यमांचे म्हणणे आहे.

दरम्यान, दहा दिवसांपूर्वी कतारच्या राष्ट्रप्रमुखांनी अमेरिकेचा विशेष दौरा केला होता. शेख तमिम यांनी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेऊन क्षेत्रिय मुद्द्यांवर चर्चा केली होती. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या आण्विक वाटाघाटींमध्ये कतार महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याच्या बातम्या यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या या वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचल्याचा दावा अमेरिका आणि इराण करीत आहेत. अशा काळात इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी कतारचा केलेला हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरतो.

leave a reply