पंतप्रधान इम्रान खान यांच्या रशिया भेटीमुळे पाकिस्तानच्या समस्या वाढतील

- पाकिस्तानच्या पत्रकारांची चिंता

इस्लामाबाद – अखेर पाकिस्तानचे पंतप्रधान रशियाचा दौरा करण्यासाठी करीत असलेल्या धडपडीला यश मिळाले. बुधवारपासून पंतप्रधान इम्रान खान यांचा रशिया दौरा सुरू होत आहे. युक्रेनची समस्या चिघळण्याच स्थितीत असताना, पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी रशिया उत्सूक नाही. मात्र यासाठी चीनने आपले वजन वापरले आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना रशियाला भेट देण्याची संधी मिळाली, असे दावे पाकिस्तानचे पत्रकार करीत आहेत. पण या दौर्‍याचा पाकिस्तानला लाभ मिळणार नाही, तर त्यामुळे पाकिस्तानची हानीच होईल, असे या पत्रकारांचे म्हणणे आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर ज्यो बायडेन यांनी जगभरातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. पण यात पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा समावेश नव्हता. ही बाब इम्रान खान यांच्या जिव्हारी लागली होती. विरोधक देखील याचा वारंवार उल्लेख करून इम्रान खान यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणीही विचारत नसल्याचे टोले लगावत आहेत. याच कारणामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इतर देशांचेही दौरे करीत नसल्याची शेरेबाजी माध्यमांकडून केली जाते. याला उत्तर देण्यासाठी इम्रान खान यांनी रशियाचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेण्यासाठी धडपड सुरू केली होती.

सुरूवातीला याला प्रतिसाद न देणार्‍या रशियाने आता चीनच्या आग्रहाखातर इम्रान खान यांच्या दौर्‍याला मंजुरी दिली. यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत आपले फोटोग्राफ्स काढून दाखविता येतील. पण या दौर्‍यातून पाकिस्तानच्या हाती काय लागेल? असा सवाल पत्रकार करीत आहेत. काही झाले तरी रशिया भारताबरोबरील आपले सहकार्य नजरेआड करून पाकिस्तानला सहाय्य करणार नाही. काश्मीरच्या प्रश्‍नावर रशिया पाकिस्तानची बाजू घेण्याची तिळमात्रही शक्यता नाही. इतकेच नाही तर रशिया पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणावर अजिबात विश्‍वास ठेवायला तयार नाही, याकडेही पाकिस्तानचे पत्रकार लक्ष वेधत आहेत.

अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर रशियाने आपल्या सुरक्षाविषयक हितसंबंधांसाठी पाकिस्तानशी सहकार्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. पण पाकिस्तानवर विश्‍वास ठेवता येणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर रशियाने हे प्रयत्न सोडून दिले होते. अशा परिस्थितीत इम्रान खान यांचा रशियाला भेट देण्याचा प्रयत्न पाकिस्तानवर उलटू शकतो. कारण युक्रेनच्या प्रश्‍नावर अमेरिका रशियावर संताप व्यक्त करीत असताना, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची रशिया भेट अमेरिकेच्या पाकिस्तानवरील नाराजीचे आणखी एक कारण ठरू शकते. याची मोठी किंमत पुढच्या काळात पाकिस्तानला चुकती करावी लागेल. त्यामुळे इम्रान खान यांच्या रशिया दौर्‍याचा पाकिस्तानला लाभ तर मिळणार नाहीच, उलट यामुळे पाकिस्तानचे नुकसानच होईल, अशी चिंता या देशातील माध्यमे व्यक्त करीत आहेत.

leave a reply