भारत आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली – रशिया चीनबरोबर विशेष लष्करी सहकार्य प्रस्थापित करणार नाही, असे सांगून रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी यासंदर्भातील बातम्या खोडून काढल्या. त्याचवेळी रशिया आणि चीनच्या विरोधात उभ्या राहत असलेल्या आशियाई किंवा पूर्वेकडील नाटोबाबतच्या शक्यता आपल्या कानावर आलेल्या आहेत, असे मार्मिक विधान रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी केले. यासंदर्भात भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी आपली चर्चा झाल्याचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी स्पष्ट केले. तर इंडो-पॅसिफिक क्षेत्रामध्ये समोर खडी ठाकत असलेली नवी आव्हाने लक्षात घेता, यावर मात करण्यासाठी देशांना नव्या व निराळ्या मार्गाने सहकार्य करावे लागेल, ही भारताची भूमिका आपण परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांच्यासमोर मांडल्याचे सूचक उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.

लडाखच्या एलएसीवर भारत व चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर, भारताचे अमेरिकेबरोबरील सर्वच पातळ्यांवरील सहकार्य अधिकच दृढ बनत चालले आहे. त्याचवेळी अमेरिका व नाटो देशांच्या विरोधात चीनचे सहकार्य मिळविणे रशियासाठी आवश्यक बनले आहे. याचा भारत व रशियाच्या द्विपक्षीय संबंधांवर अपरिहार्य परिणाम दिसू लागला आहे. अशा परिस्थितीत रशियन परराष्ट्रमंत्र्यांच्या भारतभेटीकडे केवळ दोन देशांमधीलच नाही, तर जगभरातील माध्यमांचे लक्ष लागलेले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर व रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांच्यात मंगळवारी द्विपक्षीय चर्चा पार पडली. या चर्चेत आण्विक, अवकाश आणि संरक्षण या क्षेत्रातील सहकार्य, अफगाणिस्तान आणि म्यानमारमधील परिस्थितीचा समावेश होता. बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारत व रशियाच्या सहकार्याला असाधारण महत्त्व असून हे सहकार्य अधिकच दृढ करण्यावर आपली सहमती झाल्याचे लॅव्हरोव्ह व जयशंकर यांनी स्पष्ट केले.

भारत व रशियाच्या लष्करी सहकार्याप्रमाणे रशिया चीनबरोबर लष्करी सहकार्य विकसित करणार असल्याचे दावे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी नाकारले. त्याचवेळी लडाखच्या एलएसीवर भारत व चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा दाखला देऊन इथल्या परिस्थितीकडे रशिया अत्यंत सावधपणे पाहत असल्याचे लॅव्हरोव्ह यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी भारत व चीन या जबाबदार देशांनी प्रगल्भता दाखवून सामोपचाराने सीमावाद सोडवावा, अशी आपली अपेक्षा असल्याचे रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.

रशिया व चीनच्या लष्करी सहकार्याच्या बातम्या नाकारत असताना, लॅव्हरोव्ह यांनी आशियार्ई नाटो किंवा पूर्वेकडील नाटोमध्ये, अर्थात क्वाड संघटनेत सहभागी होऊन भारत रशियाच्या हितसंबंधांना धक्का देत आहे, याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र याचा थेट उल्लेख करण्याचे रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी टाळले. यासंदर्भात आपली परराष्ट्रमंंत्री जयशंकर यांच्याशी चर्चा झालेली आहे, असे लॅव्हरोव्ह पुढे म्हणाले. तर इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबतची भारताची भूमिका आपण रशियन परराष्ट्रमंत्र्यांकडे स्पष्ट केल्याची माहिती जयशंकर यांनी दिली. शांग्री-ला परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबतची भारताचा दृष्टीकोन स्पष्टपणे मांडला होता, याची आठवण जयशंकर यांनी करून दिली.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात खड्या ठाकत असलेल्या नव्या आव्हानांवर मात करण्यासाठी देशांच्या नव्या व वेगळ्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे भारताचे पंतप्रधान म्हणाले होते. या दिशेने भारत पुढे चाललेला आहे, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी स्पष्ट केले. भारत व रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इंडो-पॅसिफिक तसेच क्वाडबाबत दोन्ही देशांचे दृष्टीकोन परस्परांपेक्षा वेगळे असल्याचे मान्य केले आहे. त्याचवेळी भारत व रशियाच्या सहकार्यावर याचा परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याची दोन्ही देशांची तयारी असल्याचेही परराष्ट्रमंत्री जयशंकर व परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले.
दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन भारताच्या भेटीवर येणार आहेत. दोन्ही देशांमध्ये होणारी वार्षिक द्विपक्षीय चर्चेत राष्ट्राध्यक्ष पुतिन सहभागी होतील. याची पूर्वतयारी करण्यासाठी परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह भारताच्या भेटीवर आले होते. या भेटीत लॅव्हरोव्ह यांनी भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या अंतर्गत रशियन संरक्षणसाहित्याची भारतात निर्मिती करण्याची तयारी दाखविली. तसेच रशिया भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करणारा देश आहे, याचीही आठवण लॅव्हरोव्ह यांनी करून दिली. याबरोबर आण्विक व अवकाश क्षेत्रात दोन्ही देश सहकार्य विकसित करणार असल्याचेही लॅव्हरोव्ह म्हणाले. याबरोबरच अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रियेवर आणि म्यानमारमधील परिस्थितीवरही दोन्ही नेत्यांची सखोल चर्चा पार पडली.

मात्र अमेरिकेबरोबरील भारताचे सहकार्य तसेच क्वाडमधील भारताचा सहभाग व रशियाचे चीनबरोबर विकसित होत असलेले लष्करी सहकार्य ही उभय देशांच्या मैत्रिपूर्ण संबंधांसमोर खडी ठाकलेली फार मोठी आव्हाने असल्याचे समोर येत आहे. पारंपरिक मित्रदेश असलेले भारत व रशिया या आव्हानांना तोंड देऊन आपले द्विपक्षीय सहकार्य भक्कम करतील, असा विश्‍वासही परराष्ट्रमंत्री जयशंकर व परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांच्या चर्चेतून व्यक्त करण्यात आलेला आहे.

leave a reply