नवी दिल्लीत लॅव्हरोव्ह व केरी यांची भेट

नवी दिल्ली – रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे पर्यावरणविषयक दूत असलेले जॉन केरी मंगळवारी भारतात होते. इतकेच नाही तर नवी दिल्ली येथील एका हॉटेलमध्ये जॉन केरी व रशियन परराष्ट्रमंत्र्यांची भेट आणि चर्चा पार पडली. माध्यमांसमोर याचे तपशील उघड करण्यात आलेले नाहीत. दोन्ही नेत्यांमध्ये पर्यावरणविषयक चर्चा पार पडली, इतकीच माहिती देण्यात येत आहे. पण युक्रेनच्या मुद्यावर अमेरिका-नाटोबरोबर रशियाचे युद्ध भडकेल, अशी दाट शक्यता समोर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर, केरी व लॅव्हरोव्ह यांची भेट लक्षवेधी ठरते. दोन्ही नेत्यांची चर्चा भारतात पार पडली, हा देखील विलक्षण घटनाक्रमातील महत्त्वाचा भाग ठरतो.

जॉन केरी यांचा चार दिवसांचा भारत दौरा सुरू झाला असून त्यांनी भारताचे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत जॉन केरी यांनी भारत व अमेरिकेच्या पर्यावरणविषयक संशोधन व सहकार्याचे मुद्दे अग्रस्थानी होते. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना, त्यांनी पर्यावरणविषयक पॅरिस ऍग्रीमेंटमधून माघार घेतली होती. पण राष्ट्राध्यक्ष बायडेन अमेरिकेच्या सत्तेवर आल्यानंतर त्यांनी या करारात नव्याने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जॉन केरी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे विशेषदूत म्हणून विविध देशांचे दौरे करीत आहेत. याआधी केरी यांनी युरोपिय देशांचा दौरा केला होता व ते बांगलादेशलाही भेट देणार आहेत.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे विशेषदूत असलेले जॉन केरी व रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांची नवी दिल्लीतील हॉटेलमध्ये झालेली चर्चा दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर औचित्यपूर्ण मानली जाते. काही आठवड्यांपूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची खूनी अशी संभावना केली होती. तसेच रशिया हा अमेरिकेला शत्रू असल्याचे विधान बायडेन यांनी केले होते. याबरोबरच बायडेन राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर त्यांनी नाटोला अधिकच सक्रीय केले असून युक्रेनच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेन व रशियामधील सीमावाद चिघळण्याच्या स्थितीत असून डोन्बास या युक्रेनच्या भूभागात रशियासमर्थकांवर लष्करी कारवाईची तयारी युक्रेनच्या लष्कराने केली आहे. त्याचवेळी नाटोचे लष्कर रशियाच्या सीमेजवळील आपल्या हालचाली वाढवित असल्याचे समोर आले आहे.

या सार्‍या हालचाली लक्षात घेतल्या तर युरोपियन वॉर अर्थात युरोपातील युद्ध अथवा महायुद्ध भडकण्याची दाट शक्यता रशियन विश्‍लेषकांनी वर्तविली होती. रशियानेही न युक्रेन व नाटो तसेच अमेरिकेच्या चिथावणीला जहाल प्रत्युत्तर देण्याचे इशारे दिले आहेत. अशा परिस्थितीत रशियन परराष्ट्रमंत्री व अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दूतांमध्ये झालेली ही चर्चा खूपच महत्त्वाची ठरते.

leave a reply