युक्रेनमधील चिथावणीवरून रशियाचा अमेरिकेला इशारा

मॉस्को/वॉशिंग्टन – युक्रेनने नाटोबरोबर युद्धसरावाची घोषणा केल्यानंतर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. युक्रेन व त्याला समर्थन देणार्‍या पाश्‍चात्य देशांनी त्यांच्या चिथावणीखोर कारवायांच्या परिणामांची जाणीव ठेवावी, असा इशारा रशियाचे परराष्ट्र उपमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी दिला. रशियाने या मुद्यावर अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केल्याची माहितीही रशियन मंत्र्यांनी दिली. रशियन मंत्र्यांनी दिलेल्या इशार्‍यापूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने रशियाने संघर्ष भडकविणारी पावले उचलू नयेत, असे बजावले होते.

२०१४ सालापासून रशिया व युक्रेनमध्ये सुरू असणारा संघर्ष अजूनही थांबला नसून उलट गेल्या काही दिवसात तो अधिकच तीव्र होण्याचे संकेत मिळाले आहेत. युक्रेन सरकार व त्याला समर्थन देणार्‍या अमेरिका तसेच नाटो सदस्य देशांकडून आक्रमक हालचाली सुरू झाल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. युक्रेन सरकारने रशियावर लादलेले निर्बंध, अमेरिकेकडून युक्रेनला जाहीर झालेले संरक्षणसहाय्य व नाटोकडून सुरू असलेल्या लष्करी हालचाली याकडे रशियाने लक्ष वेधले आहे.

दुसर्‍या बाजूला युक्रेन, अमेरिका व नाटो सदस्य देश रशियाकडून आक्रमक लष्करी हालचाली सुरू असल्याचे दावे करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर रशिया व अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये झालेली चर्चा व त्यानंतर रशियन मंत्र्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. हा इशारा देताना रशियन उपमंत्र्यांनी युक्रेनकडून देण्यात येणार्‍या चिथावण्यांना अमेरिका व नाटो देशांचे समर्थन असल्याचा आरोपही केला आहे.

रशियाने केलेल्या या आरोपापूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून युक्रेनच्या आरोपांना समर्थन देणारे वक्तव्य करण्यात आले होते. परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी, रशियाच्या लष्करी हालचालींबाबत युक्रेनकडून देण्यात आलेली माहिती खरी असून त्याबाबत रशियाने संयम दाखविण्याची गरज आहे, असे बजावले होते. त्याचवेळी या भागातील समस्या सोडविण्यासाठी अमेरिका रशियाशी चर्चा करण्यास तयार असल्याचेही म्हटले होते.

दरम्यान, अमेरिका व ब्रिटनकडून तैनात करण्यात येणार्‍या क्षेपणास्त्रांवरुन रशियाने नवा इशारा दिला आहे. ‘आम्ही वाटाघाटींचे दरवाजे बंद केलेले नाहीत. मात्र सध्याच्या स्थितीत क्षेपणास्त्रांच्या धोक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रशिया लष्करी पर्यायांचा वापर करण्याची अधिक शक्यता आहे’, असे रशियाच्या परराष्ट्र विभागच्या प्रवक्त्या मारिआ झाखारोव्हा यांनी बजावले.

अमेरिका व ब्रिटन या दोन्ही देशांनी गेल्या महिन्यात नव्या क्षेपणास्त्र तैनातीची घोषणा केली होती. त्यानुसार इंडो-पॅसिफिक तसेच आशिया खंडात मध्यम तसेच कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार आहेत. अमेरिका तसेच ब्रिटनची ही तैनाती रशियाविरोधात असल्याचा आरोप रशियाकडून करण्यात आला आहे. रशियाने यापूर्वीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता युक्रेनच्या मुद्यावरून तणाव चिघळण्याचे संकेत मिळत असताना रशियाने या मुद्यावरून पुन्हा इशारा देणे लक्ष वेधून घेणारे ठरत आहे.

leave a reply