‘जी७’च्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व जपानमध्ये द्विपक्षीय चर्चा

द्विपक्षीय चर्चालंडन – इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील स्थिती अधिकाधिक अवघड होत असल्याचे सांगून अमेरिका व जपानने आपली आघाडी अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे. ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या ‘जी७’ परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांची स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत चीनच्या वाढत्या धोक्याचा मुद्दा अग्रस्थानी होता, अशी माहिती जपानी सूत्रांनी दिली.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या हालचाली अधिकाधिक आक्रमक होत असून तैवानच्या मुद्यावरून कधीही संघर्ष उडू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिका व जपान सक्रिय झाले असून लष्करी सरावांबरोबरच राजनैतिक हालचालींनाही वेग दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन व जपानचे परराष्ट्रमंत्री हयाशी योशिमासा यांच्यात ब्रिटनमध्ये झालेली बैठकही त्याचाच भाग ठरतो.

काही दिवसांपूर्वी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी जपानचे संरक्षणधोरण अधिक आक्रमक करण्याची गरज अधोरेखित केली होती. त्यासाठी शत्रूच्या तळांवर हल्ला करण्याची क्षमता असणार्‍या यंत्रणांवर भर देण्याचे संकेतही किशिदा यांनी दिले होते. या मुद्यावर अमेरिका व जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये बोलणी झाल्याचे सांगण्यात येते.

leave a reply