ब्राझिल व तैवानमध्ये ‘५जी’ सहकार्यावर चर्चा

‘५जी’तैपेई – ब्राझिल व तैवानमध्ये नुकतीच ‘५जी’ तंत्रज्ञानातील सहकार्याबाबत बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. ब्राझील हा चीनचा लॅटिन अमेरिकी देशांमधील प्रमुख व्यापारी भागीदार देश म्हणून ओळखण्यात येतो. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ब्राझिलने चीनकडून लसीही आयात केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर तैवानबरोबरील बैठक लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

ब्राझिलच्या ‘साओ पावलो’ शहरात तैवान व ब्राझिलमधील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत ‘तैपेई इकॉनॉमिक ऍण्ड कल्चरल ऑफिस’ तसेच तैवानच्या ‘इंटरनॅशनल ट्रेड ब्युरो’चे अधिकारी उपस्थित होते. ब्राझिलकडून स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित असल्याची माहिती तैवानी सूत्रांनी दिली. यावेळी तैवानच्या अधिकार्‍यांनी आपल्या देशाने डिजिटल क्षेत्रात केलेल्या प्रगतीची तसेच या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कंपन्यांची माहिती दिली. ‘५जी’ तंत्रज्ञानातील तैवानी कंपन्यांचे योगदान अधोरेखित करून या कंपन्या ब्राझिलच्या ‘५जी’ नेटवर्कमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असा दावा तैवानी प्रतिनिधींनी केला.

ब्राझिलमध्ये गेल्याच महिन्यात ‘५जी’ तंत्रज्ञानाच्या उभारणीसाठी निविदा जाहीर करण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेदरम्यान चीनच्या ‘हुवेई’ या कंपनीला वगळण्यात आले होते. ही कंपनी ब्राझिलमध्ये अद्याप सक्रिय असली तरी अमेरिकेने दिलेल्या इशार्‍यानंतर ब्राझिल सरकारने हुवेईच्या तंत्रज्ञानाबाबत सावध भूमिका घेतली आहे. हुवेई कंपनीचे तंत्रज्ञान पूर्णपणे नाकारल्यास ब्राझिलला अमेरिका किंवा युरोपिय कंपनीची निवड करणे भाग पडणार आहे. यात अडचणी आल्यास पर्याय म्हणून ब्राझिल तैवानशी ‘५जी’संदर्भात चर्चा करीत असल्याचे मानले जाते.

ब्राझिलने चीनप्रमाणेच तैवानबरोबरही व्यापारी सहकार्य विकसित केले असून दोन देशांमधील व्यापार सुमारे ४० कोटी डॉलर्सच्या जवळपास आहे. गेल्या वर्षी चीनच्या दूतावासाने ब्राझिलच्या नेत्यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांचे अभिनंदन करु नये अथवा त्यांना संदेश पाठवू नये, अशी सूचना केली होती. ब्राझिलच्या नेत्यांनी चीनच्या दूतावासाची सूचना माध्यमांमध्ये प्रसिद्ध केली होती. यावर ब्राझिलमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. चीनला विरोध करण्यासाठी ब्राझिलमधील नागरिकांनी सोशल मीडियावर ‘विवा तैवान’ म्हणून मोहीम सुरू केली होती. ही बाब चीनच्या राजनैतिक दबावतंत्राला बसलेला मोठा धक्का मानला जातो. त्यानंतर आता ‘५जी’च्या मुद्यावर तैवानशी बोलणी सुरू करून ब्राझिलने चीनला संदेश दिल्याचे दिसत आहे.

leave a reply