रशियात सात जणांना ‘बर्ड फ्ल्यू’चा संसर्ग

- ‘बर्ड फ्ल्यू’च्या मानवी संसर्गाची जगातील पहिलीच घटना

मॉस्को – रशियातील एका ‘पोल्ट्री फार्म’वर काम करणार्‍या सात जणांना ‘बर्ड फ्ल्यू’चा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे. ‘बर्ड फ्ल्यू’च्या मानवी संसर्गाची जगातील ही पहिलीच घटना मानली जाते. रशियातील आरोग्य यंत्रणा ‘रॉस्पोट्रेबनाद्झोर’च्या प्रमुख अ‍ॅना पोपोव्हा यांनी याची माहिती दिली. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ला (डब्ल्यूएचओ) या संसर्गाबाबत अ‍ॅलर्ट देण्यात आल्याचे रशियाकडून सांगण्यात आले.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून रशियातील एका फार्मवरून ‘बर्ड फ्ल्यू’ची नवी साथ सुरू झाली असून ही साथ युरोप व आशियाई देशांमध्ये पसरली आहे. या साथीत आतापर्यंत कोट्यवधी पक्ष्यांची कत्तल करावी लागली असून काही देशांमध्ये या साथीचा प्रभाव पुन्हा वाढण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते. या पार्श्‍वभूमीवर ‘एच५एन८’ प्रकारातील बर्ड फ्ल्यूच्या मानवी संसर्गाची घटना समोर येणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

डिसेंबर महिन्यात दक्षिण रशियातील पोल्ट्री फार्मवर बर्ड फ्ल्यूचा वेगाने फैलाव होत असल्याचे समोर आले होते. याच भागातील एका पोल्ट्री फार्मवर काम करणार्‍या काही व्यक्तींमध्ये फ्ल्यूची लक्षणे आढळल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. आजाराचे निदान होत नसल्याने आजारी व्यक्तींचे नमुने सैबेरियातील ‘व्हेक्टर लॅबोरेटरी’मध्ये पाठविण्यात आले. या प्रयोगशाळेने पाठविलेल्या अहवालात, सदर आजार ‘बर्ड फ्ल्यू’च्या विषाणूमुळेच झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

‘रशियन संशोधकांनी सदर विषाणूची जनुकिय रचना वेगळी काढण्यात यश मिळविले आहे. संसर्ग झालेल्या सात जणांच्या आरोग्याला सध्या कोणताही धोका नाही. आजार पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांना झालेल्या बर्ड फ्ल्यूमधूनच पसरल्याचे समोर आले आहे. मात्र एका व्यक्तीतून दुसर्‍या व्यक्तीला संसर्ग झालेला नाही. हे एक अत्यंत महत्त्वाचे संशोधन ठरते. सदर विषाणूत अजून काही बदल होतात का हे पुढील काळात दिसून येईल’, असे रशियन आरोग्य यंत्रणेच्या प्रमुख अ‍ॅना पोपोव्हा यांनी सांगितले.
‘डब्ल्यूएचओ’ने रशियातील संसर्गाची माहिती मिळाल्याची कबुली दिली असून इतर देशांच्या आरोग्य यंत्रणांशी संपर्क साधण्यात आल्याचे स्पष्ट केले. रशियाच्या पोल्ट्री फार्मवरील कर्मचार्‍यांना झालेला संसर्ग ‘असिम्प्टोमॅटिक’ प्रकारातील असल्याचा खुलासाही आरोग्य संघटनेने केला आहे.

गेल्या दशकात चीनमध्ये पहिल्यांदा बर्ड फ्ल्यूची मोठी साथ आली होती. त्यानंतर रशियासह युरोप तसेच आशिया खंडाला तीनदा बर्ड फ्ल्यूच्या साथीचा तडाखा बसला आहे. २०१५-१६ व २०१६-१७ अशी सलग दोन वर्षे युरोपिय देशांना बसलेल्या ‘बर्ड फ्ल्यू’च्या फटक्यात जवळपास तीन कोटींहून अधिक पक्ष्यांची कत्तल करणे भाग पडले होते. गेल्या वर्षी रशियातून सुरू झालेल्या साथीचा युरोप व आशियातील २० हून अधिक देशांमध्ये प्रसार झाला असून त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला अब्जावधी डॉलर्सचा फटका बसल्याचे मानले जाते. दरम्यान, फ्रान्समधील आघाडीचे संशोधक ग्वेनेल वोर्श यांनी, ‘इन्फ्ल्युएन्झा’ प्रकारातील विषाणूंमध्ये जनुकीय बदल झटकन होऊ शकतात, असा दावा करून रशियाव्यतिरिक्त इतर देशांमध्येही मानवी संसर्गाची उदाहरणे असू शकतात अशी शक्यता वर्तविली आहे. रशियातील मानवी संसर्गाची घटना हे हिमनगाचे टोक असू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

leave a reply