अमेरिकी जवानांना ‘वोल्व्हराईन’सारखी क्षमता देण्यासाठी संशोधन सुरू

-‘सेल्युलर रिप्रोग्रामिंग’ तंत्रज्ञानाचा वापर

वॉशिंग्टन – अमेरिकी संरक्षणदलातील जवानांना हॉलिवूडपटांमधील ‘सुपरहिरों’मध्ये असणारी क्षमता देण्यासाठी वेगाने संशोधन सुरू असल्याचे समोर येत आहे. युद्ध व इतर मोहिमांमध्येजवानांना होणार्‍या जखमा लवकरात लवकर बर्‍या होण्यासाठी ‘सेल्युलर रिप्रोग्रॅमिंग’ या अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. अमेरिकी हवाईदलाच्या ‘रिसर्च लॅबोरेटरी’ व मिशिगन विद्यापीठाकडून संयुक्तरित्या या प्रकल्पावर काम सुरू असल्याची माहिती हवाईदलाने दिली आहे. तीन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या संरक्षणदलाचा भाग असलेली गोपनीय प्रयोगशाळा ‘डिफेन्स अ‍ॅडव्हान्सड् रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी’ अर्थात ‘डार्पा’ने ‘सुपर सोल्जर’ तयार करण्यासाठी यशस्वी चाचण्या घेतल्याची माहिती दिली होती.

अमेरिकेतील ‘मार्व्हेल कॉमिक्स’कडून प्रसिद्ध होणार्‍या ‘एक्स मेन’ या कॉमिक्समध्ये जनुकीय बदलांच्या आधारे अनोखी शक्ती मिळालेल्या ‘सुपरहिरों’चे कथानक रंगविण्यात आले आहे. त्यातील लोकप्रिय पात्र असणार्‍या ‘वोल्व्हराईन’मध्ये अंगावर झालेल्या जखमा झटकन भरून निघण्याची क्षमता असल्याचे दाखविले आहे. या क्षमतेमुळे तो कितीही काळ संघर्ष करू शकतो, असे दाखविणारे हॉलिवूडपटही आलेले आहेत. २००० ते २०१७ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या ‘एक्स मेन’ चित्रटमालिकेतील नऊ चित्रपटांमध्ये ‘वोल्व्हराईन’चे पात्र संघर्ष करताना दाखविण्यात आले आहे. पण ही आता केवळ कल्पना राहिली नसून अमेरिकी हवाईदल व मिशिगन विद्यापीठाकडून यावर संशोधन करण्यात येत आहे.

मिशिगन विद्यापीठातील डॉक्टर इंदिका राजपक्षे या संशोधनाची धुरा सांभाळत असून, त्यांना हवाईदलाच्या ‘७११ ह्युमन परफॉर्मन्स विंग’चे प्रमुख डॉ. राजेश नाईक व ‘एअरफोर्स डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी टीम’चे प्रमुख कर्नल चार्ल्स ब्रिस-बॉईस यांचे पथक सहकार्य करीत आहे. डॉक्टर इंदिका राजपक्षे यांनी ‘सेल्युलर रिप्रोग्रॅमिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी शरीराला झालेल्या जखमा नेहमीपेक्षा पाच पट लवकर भरून येऊ शकतात, असा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी शरीराच्या पेशींमध्ये आढळणार्‍या ‘ट्रान्स्क्रिप्शन फॅक्टर्स’ नावाच्या प्रथिनांचा वापर केला आहे. ही प्रथिने पेशींचे विभाजन, विकास व संघटन यासारखी कार्ये पार पाडणार्‍या जनुकांचे नियंत्रण करतात.

डॉक्टर राजपक्षे यांच्या संशोधनानुसार, ‘सेल्युलर रिप्रोग्रॅमिंग’च्या माध्यमातून एखाद्या स्प्रेचा वापर करून बँडेज लावावे, अशा प्रकारे जखमांवर ‘ट्रान्स्क्रिप्शन फॅक्टर्स’चा वापर करता येऊ शकतो. ही पद्धत सध्या अस्तित्वात असलेल्या ‘स्किन ग्राफ्टिंग’ या प्रकारापेक्षा अधिक वेगाने व यशस्वीरित्या शरीरावर झालेली जखम भरून काढू शकते, असा दावा करण्यात आला आहे. राजपक्षे व त्यांच्या पथकाने एखाद्या जखमेवर नेमका कोणता ‘ट्रान्स्क्रिप्शन फॅक्टर्स’ अचूक ठरु शकतो हे शोधण्यासाठी स्वतंत्र अल्गोरिदमही विकसित केला आहे. ‘विज्ञानातील संशोधनाचा वापर युद्धात संघर्ष करणारे जवान व तंत्रज्ञान यांना एकत्र आणण्यासाठी करता यावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून डॉक्टर इंदिका राजपक्षे यांचे संशोधन अशा प्रयत्नांना मिळालेले यश म्हणता येईल. आम्ही अशाच स्वरुपाच्या तंत्रज्ञानाची प्रतिक्षा करीत होतो’, या शब्दात ‘एअरफोर्स डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी टीम’चे प्रमुख कर्नल चार्ल्स ब्रिस-बॉईस यांनी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

leave a reply