भारतात ‘आयएस’कडून ‘टेरर फंडिंग’साठी बिटकॉईनचा वापर

'एनआयए'च्या आरोपपत्रातील दावा

नवी दिल्ली – भारतात ‘टेरर फंडिंग’साठी ‘बिटकॉईन’ या आभासी चलनाचा वापर होत असल्याचा खुलासा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाखल केलेल्या एका आरोपपत्रातून झाला आहे. यावर्षी मार्च महिन्यात दिल्लीतील जामिया नगर भागातून ‘आयएस’शी संबंधित काश्मिरी जोडप्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ‘एनआयए’ने हे आरोपपत्र दाखल केले असून देशात ‘टेरर फंडिंग’करीता क्रिप्टोकरन्सीच्या वापराचे उघड झालेले हे पहिले प्रकरण आहे. या दहशतवाद्याने भारतात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ले घडविण्याचे कारस्थान रचले होते, असेही ‘एनआयए’ने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रावरून स्पष्ट होते.

'टेरर फंडिंग'साठी

जहानझैब सामी वानी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग या दोघांना मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. या दोघांवर देशात दहशतवादी हल्ल्याचा कट आखल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सामीला भारतात एका दिवसात १०० स्फोट घडून आणायचे होते. हा कट तडीस नेण्यासाठी आवश्यक पैशांकरिता ‘बिटकॉइन फंडिंग’चा मार्ग निवडण्यात आला होता.

'टेरर फंडिंग'साठीसामी लिबियातील ‘आयएस’ हस्तकांच्या एका मॅसेंजर ॲपद्वारे संपर्कात होता. या ‘आयएस‘ हस्तकाबरोबर “ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी”द्वारे पैशाची व्यवस्था करण्याबाबत त्याची चर्चा होत होती, असे वानीच्या चौकशीत उघड झाले आहे. तसेच स्फोटके पुरविण्याबाबतही ‘आयएस’ च्या हस्तकाबरोबर वानीने चर्चा केली होती, याचा उल्लेख आरोपपत्रात आहे. तसेच सिरीयात असलेल्या एका ब्रिटिश महिलेच्या संपर्कातही हे जोडपे होते. या महिलेने जहानझैब सामी वानीला आपला बिटकॉइन ॲड्रेस दिल्याची बाबही समोर आली आहे.

बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीसाठी “ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी” चा वापर करण्यात येतो. तसेच आभासी चलनाच्या या व्यवहारांचा माग काढणे कठीण असते. भारतात काही प्रकरणात अमली पदार्थ तस्करीसाठी क्रिप्टोकरन्सीच्या वापर उघड झाला आहे. मात्र ‘टेरर फंडिंग’साठी क्रिप्टोकरन्सीच्या वापराचे हे भारतातील पहिले प्रकरण आहे.

दहशतवाद्यांकडून आणि गुन्हेगारी टोळ्यांकडून आभासी चलनाचा वाढता वापर जगभरातील सुरक्षा यंत्रणांच्या चिंता वाढविणारा ठरत आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने १३ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या यावर्षी कोट्यवधी डॉलर्सची क्रिप्टोकरन्सी जप्त केली होती. यातील ३०० खाती आयएस, अल कायदा आणि हमास या दहशतवादी संघटनांची होती. तीन आठवड्यांपूर्वी अल-कायदा आणि अतिरेकी गटांना क्रिप्टोकरन्सीद्वारे ‘फंडिंग’ करणाऱ्या २९ जणांना अटक करण्यात आली होती.

leave a reply