तालिबानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानचे २० जवान ठार

काबूल – शुक्रवारी तालिबानने अफगाणिस्तानच्या निमरोझ प्रांतातल्या अफगाणी लष्करी तळावर चढविलेल्या हल्ल्यात अफगाणी लष्कराचे २० जवान ठार झाले. तसेच तालिबानने अफगाणिस्तानच्या पाच ते सहा जवानांना ओलीस ठेवल्याचे वृत्त आहे. गेल्या २४ तासात तालिबानने अफगाणिस्तानच्याचोवीस प्रांतात हल्ले चढविले. यामुळे तालिबान आणि अफगाणी सुरक्षा दलांमध्ये घनघोर संघर्ष पेटल्याचे स्पष्ट होत आहे.

२० जवान ठार

शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता तालिबानने फराहमधील ‘शाख-ई-बाला कान्स्क’ येथील अफगाणीस्तानच्या लष्करी तळाला लक्ष्य केले. तालिबानच्या या हल्ल्यात २० जवान ठार झाले. तर पाच ते सहा जवान तालिबानच्या ताब्यात असल्याचे सांगितले जाते. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याआधी बुधवारी तालिबान आणि अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांमध्ये भडकलेल्या हिंसाचारात अफगाणिस्तानच्या २५ जवानांचा बळी गेला होता.

दरम्यान, गुरुवारी रात्री अफगाणिस्तानच्या नागंरहार प्रांतातल्या हवाई हल्ल्यात १२ तालिबानी ठार झाले. यात सहा पाकिस्तानी नागरिक असल्याचे समोर आले आहे. यावेळी सुरक्षादलांनी तालिबानकडून सात ‘कालाश्निकोव्ह’ रायफल्स जप्त केल्या. कतारची राजधानी दोहामध्ये अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये शांतीचर्चा सुरु झाल्यानंतर अफगाणिस्तानातील तालिबानच्या हल्ल्यांचे सत्र वाढले आहे. यामुळे अफगाणिस्तान आणि तालिबानबरोबरील शांतीचर्चेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

leave a reply