अमेरिकेतील पोलिसी कारवाईत कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू – देशभरात नव्याने निदर्शने सुरू

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अटलांटा शहरात एका पोलिसी कारवाई कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यात मिनीआपोलीस शहरात जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाचा पोलीस कारवाईत बळी गेल्यानंतर अमेरिकेत तीव्र निदर्शने भडकली असून नव्या घटनेनंतर देशातील तणाव अधिकच चिघळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अटलांटातील घटनेनंतर ‘लॉ अँड ऑर्डर’ असे ट्विट करून आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे.

अमेरिका, पोलिसी कारवाई, कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू

शुक्रवारी रात्री अटलांटातील पोलिसांना शहरातील वेंडीज् रेस्टॉरंटकडून एका गाडीसंदर्भात तक्रारीचा कॉल आला. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी रेस्टॉरंटसमोर गाडीत झोपलेल्या रेशर्ड ब्रुक्स या २७ वर्षीय कृष्णवर्णीय तरुणाची चौकशी सुरू केली. ब्रुक्स नशेत असल्याने दोन पोलिसांनी त्याला ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने पोलिसाच्या हातातील ‘टेझर गन’ खेचून पळायचा प्रयत्न केला. ब्रुक्सने पोलिसांवरच टेझर गन रोखल्याने प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी दोन गोळ्या झाडल्या. त्यात गंभीर जखमी झालेल्या ब्रुक्सचा नंतर रुग्णालयात दाखल केल्यावर मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

अमेरिका, पोलिसी कारवाई, कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू

ब्रुक्सच्या मृत्यूनंतर अटलांटात जोरदार निदर्शने सुरू झाली. शनिवारी संध्याकाळी हिंसक झालेल्या जमावाने अटलांटातील महामार्ग रोखून धरून तोडफोड सुरू केली. यावेळी ब्रुक्सच्या मृत्यूचे घटनास्थळ असणारे वेंडीज् रेस्टॉरंटही जाळण्यात आले. हिंसक दंगेखोरांना रोखण्यासाठी सुरक्षायंत्रणांनी लाठीमार व अश्रुधुराचा वापर केला असून सुमारे ४० जणांना अटक केली आहे. ब्रुक्सवर गोळी झाडणाऱ्या गॅरेट रॉल्फ या पोलिसाला निलंबित करण्यात आले असून कारवाईत सहभागी असणाऱ्या डेव्हिन ब्रॉन्सनची बदली करण्यात आली आहे. अटलांटा पोलीसदलाच्या प्रमुख एरिका शिल्ड्स यांनी राजीनामा दिला आहे.

गेल्या महिन्यात २५ मे रोजी अमेरिकेतील मिनीआपोलिस शहरात जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाचा पोलिसी कारवाईत मृत्यू झाला होता. त्यानंतर अमेरिकेतील कृष्णवर्णीय समाजात असणाऱ्या असंतोषाचा उद्रेक झाला होता. फ्लॉईड यांच्या मृत्यूचा मुद्दा कृष्णवर्णीयांचे आंदोलन म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ या आंतरराष्ट्रीय गटाने उचलून धरला होता. कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यूचे कारण पुढे करत अमेरिकेत हिंसक निदर्शने सुरू करण्यात आली होती. निदर्शनांमधील वाढता हिंसाचार रोखण्यासाठी अमेरिकेच्या काही भागात लष्कर तसेच नॅशनल गार्डच्या तुकड्याही तैनात कराव्या लागल्या होत्या.

अमेरिका, पोलिसी कारवाई, कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू

अमेरिकेतील काही नेते, कलाकार व विश्लेषकांनी ही निदर्शने म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील कट असल्याचा दावा केला होता. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देशभरात सुरू झालेल्या हिंसाचाराची गंभीर दखल घेत त्यामागे अराजकवादी व कट्टर गट असल्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. अमेरिकेतील राजकीय पक्षांनी देशातील पोलिस यंत्रणेत सुधारणांची मागणीही पुढे केली होती. दोन दिवसांपूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पोलीस सुधारणांच्या मुद्द्यावर विशेष वटहुकूम काढण्यात येईल असे संकेत दिले होते.

या पार्श्वभूमीवर अटलांटात घडलेल्या घटनेनंतर अमेरिकेत पुन्हा एकदा हिंसा भडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेतील क्लिव्हलँड व पोर्टलॅंड शहरांमध्ये शनिवारी झालेल्या निदर्शनांना पुन्हा एकदा हिंसक वळण लागल्याचे वृत्त समोर आले आहे. देशाच्या इतर भागातही निदर्शनांना पुन्हा हिंसक वळण लागण्याचे संकेत मिळाले असून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेले ‘लॉ अँड ऑर्डर’ हे ट्विट लक्ष वेधून घेणारे ठरते.

leave a reply