केंद्राकडून ‘ब्लॅक फंगस’वरील औषधांचे उत्पादन वाढविण्याच्या उत्पादकांना सूचना – औषधांची मागणी कितीतरी पटीत वाढल्यानंतर उपलब्धतेचा सरकारकडून आढावा

नवी दिल्ली – कोरोनाने बरे झाल्यावर काही जणांना ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराची लागण झाल्याचे व यातील काही जणांना प्राण गमवावे लागल्याच्या बातम्या देशभरातून येत आहेत. ‘ब्लॅक फंगस’ किंवा ‘काळी बुरशी’ या नावानेही ओळखल्या जाणार्‍या या आजाराची लागण झालेल्यांची संख्या मोठी नाही. मात्र आतापर्यंत दुर्मिळ असलेल्या या आजाराचे पूर्वीपेक्षा जास्त रुग्ण आता आढळत आहेत. त्यामुळे या आजारावरील औषधांची मागणीही कितीतरी पटीत वाढली आहे. यामुळे केंद्र सरकारने या आजारावर उपचारासाठी वापरण्यात येणार्‍या औषधांचे उत्पादन वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी आजारावरील औषधे मिळत नसल्याच्या बातम्या आल्या होत्या.

‘ब्लॅक फंगस’कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आता ‘ब्लॅक फंगस’चे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाने बरे झालेल्या काही रुग्णांना या आजाराची बाधा झाली आहे. या आजाराबाबत, त्याच्या लक्षणांबाबत रुग्णांना फारशी माहिती नसल्याने यावर वेळेत उपचार घेतले जात नाहीत. त्यामुळे रुग्णांची तब्येत बिघडते. काही जणांचे डोळेही ही फंगस पसरल्याने काढून टाकण्याची वेळ आली आहे. हा आजार नवा नसला तरी याआधी याचे नगण्य रुग्ण आढळत होते. मात्र कोरोनाबाधित मधुमेह असलेल्या व्यक्तींना हा आजार होत असल्याचे लक्षात आले आहे. कारण मधुमेहाचा आजार असलेल्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती आधीच कमी असते. त्यामुळे कोरोनाने ती आणखी कमी होते. आधीच मधुमेह असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींना स्टीरॉईडस दिल्या जातात. यामुळे रुग्णाच्या प्रतिकारक्षमतेवर आणखी परिणाम होतो. अशावेळी ‘ब्लॅक फंगस’ सारख्या बुरशीजन्य आजाराचा धोका वाढतो, असे दावे केले जातात.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान अशा राज्यांमध्ये ‘ब्लॅक फंगस’ अर्थात ‘म्युकरमायकोसिस’ आजाराचे रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत २ हजाराहून अधिक ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण आढळल्याचे नुकतेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. तसेच दोनच दिवसांपूर्वी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने(आयसीएमआर) ‘ब्लॅक फंगस’बाबत ऍडव्हायझरी जारी केली होती. यानुसार कोरोनातून बरे झाल्यावर डोळे आणि नाकाच्या आजूबाजूला त्वचा लालसर झाल्यास किंवा या भागात दुखत असल्यास दुर्लक्ष करू नका. कफ, ताप, प्रचंड डोकेदुखी, नाकाने श्‍वास घेण्यास अडचण येत असल्यास लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या, अशा सूचना ‘आयसीएमआर’ने दिल्या होत्या.

तर बुधवारी केंद्र सरकारने ऍण्टी फंगस औषधांचे उत्पादन वाढविण्याच्या सूचना उत्पादकांना केल्या आहेत. एम्पोटेरिसीन बी, फोटॉनसारखी औषधे ‘ब्लॅक फंगस’ आजारावर डॉक्टरांकडून लिहून दिली जातात. मात्र काही भागात या औषधांचा तुटवडा भासत आहे. या पार्श्‍वभूमीवर या सूचना करण्यात आल्या आहेत. याआधी एम्पोटेरिसीन बी सारख्या औषधांची उपलब्धता विविध राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये किती प्रमाणात आहे, याचा आढावा घेतल्यानंतर केंद्र सरकारने उत्पादक व पुरवठादार, तसेच आयातदारांशीही याबाबत चर्चा केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍याने दिली आहे.

leave a reply