नायजेरियात बोको हरामच्या हल्ल्यात ४१ जणांचा बळी

अबूजा – पश्‍चिम आफ्रिकी देशांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या, बोको हराम या दहशतवादी संघटनेने नायजेरियात केलेल्या हल्ल्यांमध्ये ४१ जणांचा बळी गेला. यामध्ये ११ नागरिक तर ३० जवानांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर नायजेरियन लष्कराने बोको हरामच्या विरोधात मोठी मोहीम हाती घेतली असून हवाई हल्ल्याची तयारी केल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

गेल्या चोवीस तासात बोको हरामच्या दहशतवाद्यांनी नायजेरियाच्या दोन शेजारी प्रांताना लक्ष्य केले. नायजरच्या सीमेजवळ असलेल्या योबे आणि बोर्नो या दोन प्रांतांमध्ये दहशतवाद्यांनी हल्ले चढविले. यापैकी योबे प्रांतातील गैदाम शहरात स्थानिक प्रार्थनास्थळात जाण्याच्या तयारीत असताना, बोको हरामच्या दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. यावेळी आठ ट्रक्समधून आलेल्या दहशतवाद्यांनी स्थानिकांवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये ११ नागरिक जागीच ठार झाले.

नायजेरियन लष्कर आणि बोको हरामच्या दहशतवाद्यांमध्ये यावेळी संघर्ष पेटला होता. या संघर्षात दहशतवाद्यांनी टेलिकॉम टॉवर उद्ध्वस्त केले. पुढे नायजेरियन लष्कराने हवाई हल्ले चढविल्यानंतर दहशतवाद्यांनी पळ काढला. पण तोपर्यंत काही दहशतवाद्यांनी येथे लुटपाट केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बोको हरामचे दहशतवादी जवळच दबा धरून बसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आपल्या शहरावर अजूनही दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याचा दावा स्थानिक करीत आहेत.

यानंतर दहशतवाद्यांनी शेजारच्या बोर्नो प्रांतातील मैनोक भागात असलेल्या नायजेरियन लष्कराच्या तळावर हल्ला चढविला. यावेळी दहशतवादी १५ ट्रक्समध्ये बसून आले होते. या संघर्षात ३० नायजेरियन जवानांचा बळी गेला तर काही जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी येथील लष्कराचा टँकर आणि इमारतींना आगी लावल्याचे लष्करी अधिकार्‍यांनी सांगितले.

नायजेरिया, नायजर, कॅमेरून या देशांमध्ये दहशत माजविणारी बोको हराम ही अल कायदा संलग्न संघटना होती. पण काही वर्षांपूर्वी आयएसने इराक आणि सिरियामध्ये विध्वंस माजविल्यानंतर बोको हरामने अल कायदाबरोबर असलेले संबंध तोडून आयएसशी स्वत:ला जोडून घेतले होते. इंधन आणि खनिजांनी संपन्न असलेल्या नायजेरिया, नायजर या देशांमध्ये बोको हरामने गेल्या काही वर्षांमध्ये धुमाकूळ घातला आहे. गेल्या महिन्याभरातच या दहशतवादी संघटनेने नायजेरियात चढविलेल्या हल्ल्यांमध्ये शंभरहून अधिक जणांचा बळी गेला आहे.

गेल्या दशकभरापासून एकट्या नायजेरियामध्ये दहशत माजविणार्‍या या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यांमध्ये ३० हजाराहून अधिक जणांचा बळी गेला. तर किमान ३० लाख नायजेरियन नागरिक विस्थापित झाले आहेत. नायजेरियातील या अस्थैर्याचे परिणाम शेजारच्या नायजरबरोबरच कॅमेरून, चाड व इतर देशांमध्ये देखील होत आहेत.

leave a reply