घरातही मास्क लावण्याची वेळ

- निती आयोगाचे आवाहन

नवी दिल्ली – देशात दरदिवशी आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या साडे तीन लाखांच्या वर पोहोचली आहे. तसेच चोवीस तासात सुमारे अडीच हजाराहून अधिक जणांचे प्राण या साथीने जात आहेत. मात्र कित्येक ठिकाणी अजूनही मास्क लावणे व सुरक्षित अंतर राखण्यासारख्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. पण सध्याचा काळ हा घरीही मास्क लावावा लागेल, असा असल्याचे निती आयोगाचे सदस्य डॉ.व्ही.के पॉल यांनी बजावले आहे. त्याचवेळी घाबरून जाऊ नका. अनावश्यक भीती पसरत असल्याने त्याचे विपरीत परिणाम होत असून यामुळे रुग्णालयांमधील ताण वाढत असल्याचे, एम्सचे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

देशात रविवारी ३ लाख ५२ हजार रुग्ण आढळले होते. तसेच २ हजार ८१२ जणांचा बळी गेला होता. सोमवारीही विविध राज्यांकडून जाहीर करण्यात आलेली माहिती पाहता सोमवारच्या दिवसात देशभरात आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांवर राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये चोवीस तासात रविवारच्या तुलनेत १८ हजार कमी रूग्ण आढळले आहेत. सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ४८ हजार नवे रुग्ण नोंदविण्यात आले, तसेच ५२४ जणांचा बळी गेला. याशिवाय तब्बल ७१ हजार रुग्ण एकाच दिवसात बरे झाले आहेत. उत्तर प्रदेशात चोवीस तासात २४९ जण दगावले असून ३३ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकात २९ हजार ७४४ रुग्ण सापडले, तर २०१ जणांचा या साथीमुळे मृत्यू झाला. केरळात २८ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात अजूनही कोरोनाची दुसरी लाट शिखर गाठण्यासाठी अवधी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत दरदिवशी आढळणार्‍या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्या पाच लाखांवरही पोहोचू शकते, अशी शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहेत. या पार्श्‍वभूमीवर निती आयोगाचे सदस्य डॉ.व्ही.के पॉल यांनी घरातही मास्क लावण्याची सध्याची वेळ असल्याचा इशारा दिला. मास्क लावणे व सुरक्षित अंतर ठेवण्याच्या नियमांचे पालन केले, तर कोरोनाची साखळी आणि संक्रमण थांबविता येईल, असे पॉल म्हणाले.

एखादा व्यक्ती कोरोनाबाधीत झाला असेल आणि तो मास्क लावणे व सुरक्षित अंतर न पाळणे यासारख्या नियमांचे पालन करीत नसेल, तर तो व्यक्ती ३० दिवसात सुमारे ४०० हून अधिक जणांना संक्रमित करू शकतो. हेच त्याच व्यक्तीने हे नियम ५० टक्के जरी पाळते, तर त्याच्यापासून १५ जणांना कोरोनाची लागण होऊ शकते. तेच ७५ टक्के नियम पाळले, तर त्याच्यापासून केवळ दोन ते तीन जण बाधीत होण्याचा धोका असतो, असे डॉ. पॉल म्हणाले. याकडे लक्ष वेधून डॉ. पॉल यांनी आता घरातही मास्क लावण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे.

तसेच कोरोनामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नसून बहुतांश रुग्ण घरातच डॉक्टरी सल्ल्याने उपचाराद्वारे बरे होऊ शकतात. सर्व कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची आवश्यकता नसते. कित्येक कोरोनाबाधीत हे आपल्याला नंतर रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली आणि ऑक्सिजन चढविण्याची वेळ आली, तर या भीतीने रुग्णालयात आधीच भरती होत आहेत. यामुळे रुग्णालयात गर्दी उसळत आहे. पण त्यामुळे आवश्यक रुग्णांना उपचार मिळू शकत नाहीत, असे एम्सचे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांनी म्हटले आहे. तसेच काहीजण अशाच पद्धतीने घाबरून घरात औषधे साठवत आहेत व यामुळे बाजारात तुटवडा जाणवत असल्याचेही गुलेरिया म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना गांभिर्याने स्थानिक व छोटे कटेंन्मेंट झोन बनविण्याकडे लक्ष पुरविण्यास पुन्हा एकदा सांगितले आहे. ज्या भागात रुग्ण आढळत आहेत, तेथे असे कटेंन्मेंट झोन बनविण्यावर भर देण्याचे धोरण अवलंबा, असे केेंद्रीय गृहमंत्रालयातर्फे राज्यांना सांगण्यात आले.

leave a reply