चाडमध्ये लष्करी राजवट आणि बंडखोरांमध्ये संघर्ष भडकण्याची शक्यता

एन’जामेना – गेल्या आठवड्यात बंडखोरांच्या हल्ल्यात राष्ट्राध्यक्ष इद्रिस देबी यांचा बळी गेल्यानंतर चाडमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चाडमधील लष्करी राजवट आपल्याला मान्य नसल्याचे सांगून बंडखोरांनी राजधानी एन’जामेनावर ताबा घेण्याची धमकी दिली आहे. तर आपल्या राष्ट्राध्यक्षांचा बळी घेणार्‍या बंडखोरांमध्ये चर्चा शक्य नसल्याची घोषणा चाडच्या राजवटीने केली आहे. तसेच नायजरने या बंडखोर संघटनेच्या नेत्याला अटक करण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन चाडच्या हंगामी सरकारने केले आहे.

गेल्या आठवड्यात चाडचे राष्ट्राध्यक्ष ‘इद्रिस देबी’ हे बंडखोरांबरोबर झालेल्या संघर्षात ठार झाले. त्याआधी चाडमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष देबी यांचा ‘पॅट्रियॉटिक साल्वेशन मुव्हमेंट’ हा पक्ष जवळपास ७९.३ टक्के अशा मोठ्या फरकाने विजयी ठरला होता. शपथविधीला अवघे काही तास शिल्लक असताना देबी बंडखोरांच्या हल्ल्यात ठार झाल्यामुळे चाडमध्ये अस्थैर्य निर्माण झाले होते. देबी यांच्याशी प्रामाणिक असलेल्या चाडच्या लष्कराने देशाची सत्तासूत्रे हाती घेतली तसेच देबी यांचे पूत्र जनरल महामात काका यांना हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त केले.

इद्रिस देबी यांच्या मृत्यूनंतर चाडच्या लष्कराबरोबर चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याचे संकेत ‘फ्रंट फॉर चेंज अँड कॉन्कॉर्ड चाड’ (एफएसीटी) या कट्टरपंथी बंडखोर संघटनेने दिले होते. पण गेल्या तीन दशकांपासून चाडच्या सत्तेवर असणार्‍या लष्करी राजवटीने बंडखोरांशी कुठल्याही प्रकारची चर्चा शक्य नसल्याचे स्पष्ट केले. ‘एफएसीटी’ या दहशतवादी संघटनेने आपल्या राष्ट्राध्यक्षांची हत्या केल्याचा आरोप करून लष्कराने बंडखोर संघटनेच्या नेत्याच्या अटकेचे आदेश काढले आहेत. यासाठी नायजर या शेजारी देशाने आपल्याला सहाय्य करावे, असे आवाहन चाडचे लष्कर करीत आहे.

तर एफएसीटी या बंडखोर संघटनेने देखील लष्करी राजवटीच्या विरोधात संघर्ष छेडण्याची तयारी केली आहे. लवकरच राजधानी एन’जामेना ताब्यात घेण्याची घोषणा या बंडखोर संघटनेने केली आहे. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा चाडमधील लष्करी राजवटीला पाठिंबा असल्याचा दावा केला जातो. तर आफ्रिकन महासंघ चाडमधील लष्करी राजवटीशी नाखूश असल्याचे बोलले जाते.

leave a reply