अफगाणिस्तानातील बॉम्बस्फोटात २७ ठार – अमेरिका व नाटोची सैन्यमाघार सुरू

काबुल – अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील लोगार प्रांतात दहशतवाद्यांनी घडविलेल्या कारबॉम्बस्फोटात २७ जणांचा बळी गेला. यामध्ये विद्यार्थी तसेच अफगाण सरकारसंलग्न सशस्त्र गटाच्या सदस्यांचा समावेश होता. या हल्ल्यासाठी तालिबान जबाबदार असल्याचा आरोप अफगानिस्तानच्या अंतर्गत संरक्षण मंत्रालयाने केला. तर तालिबानने हा आरोप फेटाळला आहे. दरम्यान, तालिबानने अमेरिकेला सैन्यमाघारीसाठी दिलेली मुदत पूर्ण होत असताना हा हल्ला झाला, ही लक्षणीय बाब ठरते.

शनिवारपासून अमेरिका व नाटो जवानांची अफगाणिस्तानातील माघार सुरू झाली आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेचे अडीच ते साडेतीन हजार जवान तैनात असल्याचा दावा केला जातो. १ मेपासून सुरू झालेली ही सैन्यमाघार ११ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकेचे ध्येय पूर्ण झाल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केला होता. पण तरीही ही माघार घेत असताना अमेरिकी जवानांवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनचे म्हणणे आहे.

म्हणून आपल्या जवानांची ही माघार सुरक्षितरित्या पार पडावी, यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात ६०० अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. याशिवाय पर्शियन आखातात विमानवाहू युद्धनौका आणि दोन बॉम्बर विमाने देखील सज्ज ठेवल्याची माहिती पेंटॅगॉनने दिली होती. पेंटॅगॉनने उघडपणे उल्लेख केला नसला तरी तालिबानकडूनही अमेरिकेच्या या माघारीला धोका असल्याचा इशारा या देशाचे लष्करी विश्‍लेषक देत आहेत.

शुक्रवारी संध्याकाळी पाकिस्तानच्या सीमेजवळील अफगाणिस्तानातील लोगार प्रांतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठीही तालिबान जबाबदार असल्याचा आरोप केला जातो. एका गेस्टहाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ घडविलेल्या या स्फोटात २७ जणांचा बळी गेला. या स्फोटात किमान ९० जण जखमी झाले आहेत. स्थानिक मोठ्या संख्येने सण साजरा करण्यासाठी एकत्र जमले असताना, दहशतवाद्यांनी हा स्फोट घडविला. तर शुक्रवारीच अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातही दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केला. यामध्ये चार जण जखमी झाले.

गेल्या २० वर्षांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या संघर्षात आत्तापर्यंत ४७,२४५ नागरिकांचा बळी गेला आहे. याशिवाय तालिबानविरोधी संघर्षात ६६ हजाराहून अधिक अफगाणी जवानांनी आपले प्राण गमावले आहेत. या दोन दशकांच्या संघर्षात लाखो जण विस्थापित झाल्याचा दावा केला जातो. अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानातील हिंसाचार अधिकच तीव्र होईल, असे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

तालिबान अजूनही अल कायदा आणि पाकिस्तानातील हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनांबरोबर सहकार्य ठेवून असल्याचा आरोप अफगाणी सुरक्षा व गुप्तचर यंत्रणा करीत आहेत. तसेच पाकिस्तानचे लष्कर आणि या देशाची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ देखील अमेरिकेच्या माघारीचा फायदा घेऊन अफगाणिस्तानवर पकड मिळविण्याचे इरादे बाळगून असल्याचे अफगाणी यंत्रणांचे म्हणणे आहे. पण अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबानला चिरडण्यासाठी आपणही सज्ज असल्याचे अफगाणी लष्कराने ठासून सांगितले आहे.

leave a reply