पाकिस्तानच्या लाहोरमधील बॉम्बस्फोटात पाच जणांचा बळी

बॉम्बस्फोटात पाच जणांचा बळीलाहोर – गुरुवारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची राजधानी लाहोरच्या बाजारभागात झालेल्या बॉम्बस्फोटात पाच जणांचा बळी गेला असून २५ जण जखमी झाले. मोटारसायकलवर बॉम्ब लादून हा स्फोट घडविल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंजाब प्रांत हे या देशातील सत्तेचे केंद्र मानले जाते. त्यामुळे पंजाबच्या राजधानीत स्फोट घडवून दहशतवाद्यांनी पाकिस्तानला हादरा दिल्याचा दावा केला जातो.

लाहोरच्या प्रसिद्ध अनारकली बाजारातील लोहारी गेट भागात हा स्फोट झाला. भारत-पाकिस्तानमधील अटारी-वाघा सीमेपासून २८ किलोमीटर अंतरावर हा हल्ला झाला. दुपारी पावणेदोनच्या सुमारास बाजारात गर्दी असताना दहशतवाद्याने येथील प्रसिद्ध दुकानासमोर बॉम्ब लपविलेली मोटारसायकल उभी केली व हा स्फोट घडविला. गुरुवारी उशीरा ‘बलोच नॅशनल आर्मी-बीएनए’ या बंडखोर गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

काही दिवसांपूर्वीच बलोच बंडखोर गटाने पाकिस्तानी यंत्रणांना नव्या हल्ल्यांचा इशारा दिला होता. पाकिस्तानातील बँका, वित्तसंस्थांना लक्ष्य करणार असल्याचे या बंडखोर गटाने जाहीर केले होते. ‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर-सीपीईसी’शी जोडलेल्या बँका व वित्तसंस्था बलूच जनतेचे शोषण करीत असल्याचा आरोप या बंडखोर संघटनेने केला होता.

बॉम्बस्फोटात पाच जणांचा बळीपंजाब प्रांत पाकिस्तानच्या सत्तेचे केंद्र असून या प्रांताला दहशतवादाचा फटका बसू नये, यासाठी पाकिस्तानच्या यंत्रणा विशेष सावधगिरी बाळगतात. हे लक्षात घेऊन, बलोच बंडखोरांनी तसेच दहशतवादी संघटनांनीही पंजाबला लक्ष्य करण्याची तयारी सुरू केली आहे. याबरोबरच पाकिस्तानच्या राजधानीलाही हादरविण्याचे सत्र दहशतवाद्यांनी सुरू केल्याचे दिसते.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये तीन पोलीस जवानांची भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ‘तेहरिक-ए-तालिबान’ या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच येत्या काळात असे आणखी हल्ले चढविले जातील, असे या दहशतवादी संघटनेने धमकावले होते.

गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेने वझिरिस्तान प्रांतात केलेल्या कारवाईत तेहरिकच्या वरिष्ठ कमांडरला ठार केले होते. त्याला उत्तर म्हणून तेहरिकने पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेला लक्ष्य केले. पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री शेख रशिद यांनी पुढच्या काळात असे आणखी काही हल्ले होतील, असे सांगून जनतेच्या चिंता वाढविल्या होत्या.

leave a reply