युरोपला सुरक्षायंत्रणा पुरविणार्‍या कंपनीचे चीन सरकार व लष्कराशी संबंध

लष्कराशी संबंधबु्रसेल्स/बीजिंग – युरोपातील विमानतळांसह आघाडीची बंदरे व सीमा तपासणी नाक्यांवर बसविण्यात आलेले बहुतांश ‘सिक्युरिटी स्कॅनर्स’ एकाच चिनी कंपनीचे असल्याचे समोर आले आहे. ‘न्यूकटेक’ नावाच्या या चिनी कंपनीचे चीनची कम्युनिस्ट राजवट तसेच लष्कराशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. चीनची राजवट या कंपनीच्या माध्यमातून अत्यंत संवेदनशील तसेच वैयक्तिक स्वरुपाची माहिती मिळवू शकते असा दावा युरोपातील सायबरसुरक्षा कंपन्या तसेच तज्ज्ञ करीत आहेत.

परदेशात कार्यरत असणार्‍या सर्व चिनी कंपन्यांना त्यांच्याकडील माहिती चीनच्या राजवटीला पुरविण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जगभरात सक्रिय असणार्‍या चिनी कंपन्यांची कार्यपद्धती व विश्‍वासार्हतेवर सवाल उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. न्यूकटेकसंदर्भात उपस्थित झालेले मुद्देही त्याचाच भाग मानला जातो. युरोपिय महासंघातील २७ पैकी २६ देशांमध्ये या चिनी कंपनीने तयार केलेल्या यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, युरोपातील आघाडीची बंदरे, विमानतळ, दोन देशांमधील सीमासुरक्षा चौक्या, राजनैतिक कार्यालये अशा सर्व ठिकाणी न्यूकटेकचे सिक्युरिटी स्कॅनर्स बसविण्यात आले आहेत. या स्कॅनर्सच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची व संवेदनशील माहिती स्कॅन होऊन चिनी कंपनीच्या हातात पडते, असा इशारा युरोपिय तज्ज्ञ व विश्‍लेषकांनी दिला आहे. चीनमध्ये उघुरवंशियांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेसाठीही या कंपनीने आपल्या यंत्रणा पुरविल्याचे उघड झाले आहे.

अमेरिका व कॅनडा या दोन्ही देशांनी या न्यूकटेकच्या यंत्रणांवर बंदी घातली असून अमेरिकेने कंपनीचा समावेश ब्लॅकलिस्टमध्ये केला आहे. युरोपातील लिथुआनियाच्या सरकारनेही यापूर्वी बसविलेल्या न्यूकटेकच्या यंत्रणा काढण्याचे आदेश दिले आहेत. न्यूकटेकची स्थापना चीनमधील ‘त्सिंगुआ युनिव्हर्सिटी’चा उपक्रम म्हणून करण्यात आली होती. चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हु जिंताओ यांच्या मुलाने अनेक वर्षे सदर कंपनीचा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

leave a reply