कझाकस्तानच्या अल्माटीमध्ये हाय अलर्ट जारी

हाय अलर्ट जारीअल्माटी/मॉस्को – कझाकस्तानमधील आणीबाणी बुधवारी मध्यरात्रीपासून मागे घेण्यात आली. तरीही या देशासमोरील आव्हाने अजूनही कायम आहेत. अल्माटीमध्ये सरकारविरोधी गटांनी नव्या निदर्शनांची घोषणा केली आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी संरक्षणमंत्री मुरात बेकतानोव यांची हकालपट्टी केली. निदर्शनांच्या काळात संरक्षणमंत्री बेकतानोव आपल्या जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्यामुळे ही कारवाई केल्याचे राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी जाहीर केले.

नववर्षाच्या सुरुवातीला कझाकस्तानमध्ये इंधन दरवाढीविरोधात हिंसक निदर्शने पेटली होती. यामध्ये १६४ जणांचा बळी गेला तर शेकडो जण जखमी झाले. बळींमध्ये १४ सुरक्षा जवानांचा समावेश होता. राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांनी ही उत्स्फूर्त निदर्शने नसून सुनियोजित दहशतवादी हल्ला असल्याचा आरोप केला. निदर्शनांची तीव्रता वाढल्यानंतर देशात आणीबाणी लागू करण्यात आली. तसेच राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी रशियाप्रणित ‘कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन-सीएसटीओ’ या माजी सोव्हिएत देशांना लष्करी सहाय्यासाठी आवाहन केले होते.

कझाकस्तानातील या अराजकामागे परदेशी शक्ती जबाबदार असल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी ठेवला होता. या निदर्शनांच्या काळात अटक केलेल्या कझाकस्तानच्या गुन्हेगारी विश्‍वाचा नेता अरमान डिके याचे तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलूत कावुसोग्लू यांच्याशी संबंध असल्याचे समोर आले होते. त्यामुळे कझाकस्तानातील हिंसाचारामागे तुर्की असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. कझाकस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष नूर सुल्तान आणि दहशतवादविरोधी गटाचे माजी प्रमुख देखील यात सहभागी असल्याचे आरोप झाले होते. तर अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे कझाकस्तानमध्ये अस्थैर्य माजल्याचे आरोप रशियामधून झाले होते. अमेरिकेने हे आरोप फेटाळले आहेत.

निदर्शकांवर आवर घालण्यासाठी राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी माजी राष्ट्राध्यक्ष नूर सुल्तान यांना देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या पदावरुन दूर केले. तसेच नूर सुल्तान यांच्या कुटुंबियांना देखील महत्त्वाच्या पदावरुन कमी केले. राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांच्या या निर्णयाचे कझाकस्तानच्या जनतेने समर्थन केले होते. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली.

हाय अलर्ट जारीयामुळे दहा दिवसांच्या तैनातीनंतर रशिया व सीएसटीओमधील इतर सदस्य देशांच्या जवानांनी माघार घेतली. रशियन लष्कराची शेवटची तुकडी व विमान बुधवारी अल्माटीमधून मॉस्कोसाठी रवाना झाले. कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी बुधवारच्या मध्यरात्रीपासून आणीबाणी मागे घेण्याची घोषणा केली. पण पुन्हा एकदा कझाकस्तानमधील सरकारविरोधी गटांनी अल्माटीमध्ये नव्या निदर्शनांची हाक दिली आहे.

१९९७ सालापर्यंत अल्माटी कझाकस्तानची राजधानी म्हणून प्रसिद्ध होती. कझाकस्तानातील सर्वात मोठे शहर आणि व्यापारी केंद्र म्हणून अल्माटीकडे पाहिले जाते. या शहरातील अस्थैर्याचा फटका कझाकस्तानच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यामुळे पुन्हा या शहरात हिंसक निदर्शने पेटू नये, यासाठी कझाकस्तानच्या सुरक्षा यंत्रणेने हाय अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, माजी राष्ट्राध्यक्ष नूर सुल्तान आणि राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांच्यातील राजकीय मतभेदांमुळे हा संघर्ष भडकल्याचा दावाही केला जातो. राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी केलेल्या कारवाईनंतर नूर सुल्तान यांनी पलायन केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण आपण अजूनही कझाकस्तानात असल्याचा व्हिडिओ नूर सुल्तान यांनी प्रसिद्ध केला आहे.

leave a reply