वझिरीस्तानातील हल्ल्यात पाकिस्तानचे पाच जवान ठार

पाच जवान ठारइस्लामाबाद – ‘तेहरिक-ए-तालिबान’शी पाकिस्तानचे सरकार चर्चा करीत असल्याची माहिती उघड करून पंतप्रधान इम्रान खान यांनी सार्‍या पाकिस्तानला धक्का दिला होता. याला काही तास उलटत नाही तोच, तेहरिकने पाकिस्तानी लष्कराच्या पाच जवानांचा बळी घेतला. पाकिस्तानच्या वझिरीस्तानात लष्कराच्या गस्तीवाहनावर दहशतवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यात हे पाच जवान ठार झाले. अजूनही उघडपणे कबुली दिलेली नसली, तरी या हल्ल्यामागे तेहरिकचाच हात असल्याचे संकेत मिळत आहेत. याचा दाखला देऊन पाकिस्तानच्या पत्रकारांनी दहशतवाद्यांशी चर्चा करणार्‍या पंतप्रधान इम्रान खान व त्यांच्या सरकारचे वाभाडे काढण्यास सुरूवात केली आहे.

शनिवारी अफगाणिस्तानच्या सीमेजवळील उत्तर वझिरीस्तानच्या स्पिनवाम भागात दहशतवाद्यांनी हा स्फोट घडविला. पाकिस्तानच्या लष्करानेच या स्फोटाची माहिती जाहीर केली. तर पाकिस्तानचे माहिती व प्रसारणमंत्री फवाद चौधरी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. पण फवाद चौधरी किंवा पाकिस्तानच्या लष्कराने या हल्ल्यासाठी कुठल्याही दहशतवादी संघटनेवर संशय व्यक्त करण्याचे टाळले. काही तासांपूर्वी याच फवाद चौधरी यांनी दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची आवश्यकता असल्याचे सांगून तेहरिकबरोबर सुरू केलेल्या चर्चेचे समर्थन केले होते.

पाच जवान ठारपण शनिवारच्या स्फोटानंतर पंतप्रधान इम्रान, त्यांचे सरकार आणि पाकिस्तानी लष्करावर पाकिस्तानची जनता व माध्यमांमधील एक गट टीका करीत आहे. तालिबानने याआधीच पाकिस्तान व तेहरिकमधील वादात पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर तेहरिक-ए-तालिबानचे नेते पाकिस्तानबरोबर कुठल्याही प्रकारची चर्चा शक्य नसल्याचे सांगून अफगाणिस्तानप्रमाणे पाकिस्तानातही आपली राजवट आणण्याच्या धमक्या देत आहेत.

तरीही पंतप्रधान इम्रान खान यांनी तेहरिकबरोबर चर्चा करीत असल्याचे जाहीर केल्यानंतर पाकिस्तानात संतापाची लाट उसळली. २०१४ साली पेशावरमधील आर्मी स्कूलवरील हल्ल्यात १३२ मुलांचा बळी घेणार्‍या आणि पाकिस्तानी जवानांचे शीर फुटबॉलसारखे लाथाडणार्‍या भयंकर दहशतवादी संघटनेशी इम्रान सरकार कशी काय चर्चा करू शकते? असे जळजळीत प्रश्‍न पाकिस्तानची जनता, विरोधी पक्षनेते व माध्यमांमधील काही गट विचारीत आहेत.

त्याचबरोबर तालिबानने काबुलची सूत्रे हाती घेतल्यापासून अफगाण सीमेजवळील उत्तर व दक्षिण वझिरीस्तान, कुर्राम तसेच बलोचिस्तान या पाकिस्तानातील प्रांतातील दहशतवादी हल्ले वाढले आहेत. १ जुलै ते १५ सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तानी लष्करावरील तेहरिकच्या हल्ल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याची माहिती, ‘पाकिस्तान इन्स्टिट्युट ऑफ पीस स्टडिज्’ या पाकिस्तानी अभ्यासगटानेच दिली, याकडेही पाकिस्तानी माध्यमे लक्ष वेधून देत आहेत. तर पाकिस्तान सरकारने जाहीर केले असले तरी तेहरिकने चर्चेचा दावा फेटाळला आहे. इम्रान सरकारबरोबर चर्चा किंवा संघर्षबंदी झाली नसल्याचे तेहरिकने जाहीर केले आहे.

leave a reply