अमेरिकेत स्थलांतरितांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी

- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – ‘कोरोनाव्हायरसच्या हल्ल्यामुळे संकटात सापडलेल्या ग्रेट अमेरिकन्सचे रोजगार सुरक्षित ठेवण्यासाठी यापुढे स्थलांतरितांच्या अमेरिकेतील प्रवेशावर तात्पुरती बंदी असेल’, अशी मोठी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. यासंबंधीतचे विशेष आदेश पारित करण्यात येतील, असेही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले. यानंतर अमेरिकेत खळबळ माजली असून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अमेरिकेत कोरोनाव्हायरसने थैमान घातले असून आतापर्यंत यात ४२ हजार जणांचा बळी गेला आहे. तर या साथीची लागण झालेल्यांची संख्या आठ लाखांजवळ गेली आहे. या साथीच्या भयंकर फैलावामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या साथीने दोन कोटीहून अधिक जणांनी रोजगार गमावले असून या बेरोजगारांना सवलती पुरविल्या जात आहेत. याचा जबर बोजा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर पडत असल्याचा दावा केला जातो.

या साथीचा फैलाव मोठा असून आणखी काही आठवडे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला याचा भार सहन करावा लागणार असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी हा कठोर निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. या निर्णयामुळे परदेशी नागरिकांना कायमस्वरूपी वास्तव्य करता येणार नाही. यामुळे ग्रीन कार्ड वितरण आणि वर्क विजा प्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत.

याआधीच अमेरिकेत कोरोनाव्हायरसचा फैलाव झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हिसा संर्दभातील सर्व प्रकिया स्थगित केल्या होत्या. चीन आणि युरोपातून दाखल होणारी विमानसेवा रद्द केली होती. त्याचबरोबर कॅनडा, मेक्सिकोच्या सीमारेषा पूर्णपणे बंद करुन स्थलांतरितांचे मार्ग बंद केले होते. तर आता अमेरिकन जनतेच्या रोजगाराला प्राधान्य देऊन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा कठोर निर्णय घेतला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची ही घोषणा कायमस्वरुपी नसून पुढील १२० दिवसांसाठी ही तरतूद असेल, असा दावा केला जातो. पण विरोधी पक्षनेत्यांनी ट्रम्प यांच्या या निर्णयावर टीका केली. यामुळे अमेरिकेत अराजकता माजेल, असा आरोप विरोधक करीत आहेत.

दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयाचा भारताच्या आयटी क्षेत्राला फटका बसणार असल्याचा दावा केला जातो.

leave a reply