ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलाबरोबर सराव करणार

लंडन – भारतीय नौदलाबरोबरील युद्धसरावासाठी ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका एचएमएस क्विन एलिझाबेथ आपल्या पथकासह भारताच्या सागरी क्षेत्रात दाखल होणार आहे. ब्रिटनने याची घोषणा केली. भारत आणि फ्रान्समध्ये सातत्याने सुरू असलेल्या युद्धसरावाच्या पार्श्‍वभूमीवर, ब्रिटनच्या नौदलाचा भारतीय नौदलाबरोबरील युद्धसराव लक्षवेधी ठरतो. यामुळे युरोपिय देश इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपले स्वारस्य अधिकाधिक वाढवू लागल्याचे दिसत आहे. यामुळे भारताचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

सुमारे तीन अब्ज पौंड इतके वजन असलेली ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका एचएमएस क्विन एलिझाबेथ आपल्या पथकासह भारतात युद्धसरावासाठी जाणार असल्याची घोषणा ब्रिटनने केली. ‘एफ३५बी’ हे स्टेल्थ विमाने देखील या सरावात सहभागी होतील. सदर युद्धनौकेसोबत टॉमाहॉक क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली पाणबुडी व विनाशिका देखील ब्रिटिश नौदलाच्या पथकामध्ये असतील. त्यामुळे ब्रिटनच्या नौदलाच्या पथकाचा हा भारतीय नौदलाबरोबरील सराव अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

भारतीय नौदलाबरोबरील ब्रिटनचा हा युद्धसराव दोन्ही देशांच्या नौदलाचे सहकार्य प्रस्थापित करणारा व हे सहकार्य वृद्धिंगत करणारा ठरेल, असा विश्‍वास ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी व्यक्त केला. संशोधन, विकास व प्रशिक्षण यांच्या आघाडीवर भारत आणि ब्रिटन हे नैसर्गिक भागीदार देश ठरतात, असा दावा संरक्षणमंत्री वॉलेस यांनी केला आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील संभावणारे धोके व यापासून असुरक्षित बनत असलेली जागतिक व्यवस्था, इत्यादी समस्येवर मात करण्यासाठी ब्रिटन भारताबरोबर सहकार्य करील, असेही पुढे वॉलेस यांनी म्हटले आहे.

leave a reply