अर्थसंकल्पाने दीर्घकालिन विकासाची पायाभरणी केली आहे

- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

विकासाची पायाभरणीनवी दिल्ली – रेल्वे, रस्त्यांच्या उभारणीसाठी लागणारा भांडवली निधी २०२१-२२च्या अर्थसंकल्पात सुमारे ३४.४ टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. विकासासाठीच्या भांडवली गुंतवणुकीत इतक्या प्रचंड प्रमाणात वाढ करून या अर्थसंकल्पात देशाच्या विकासाची पायाभरणी करण्यात आली आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सीतारामन यांनी हा विश्‍वास व्यक्त केला.

Advertisement

लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना उपस्थित करण्यात आलेले प्रश्‍न व शंका यांना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी उत्तर दिले. कोरोनाची साथ आलेली असतानाही केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम तितक्याच जोरदारपणे राबविला. या अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब पडल्याचे दिसत आहे. आरोग्यविषयक सुविधांची उभारणी व विकास, कृषीक्षेत्रासाठीच्या पायाभूत सुविधांचा विकास, यासाठी करण्यात आलेल्या भरीव आर्थिक तरतुदीचे सुपरिणाम अर्थव्यवस्थेवर होतील, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

रेल्वे व रस्ते यांच्या उभारणीसाठी व संरक्षणासाठी करण्यात आलेल्या भांडवली गुंतवणुकीचे प्रमाण ३४.५ टक्क्यांनी वाढविले आहे. याकडे अर्थमंत्र्यांनी लक्ष वेधले. दिर्घकालिन विकासाची पायाभरणीच या तरतुदीद्वारे सरकारने केलेली आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था दमदार प्रगती करील व पुढच्या काही दशकात भारताची गणना जगातील महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये होईल, असे सीतारामन यांनी म्हटले आहे. कोरोनाची साथ हातळण्यात सरकारला फार मोठे यश मिळाले. या साथीचा भारतातील मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणे सोपे गेले असून अर्थव्यवस्था रूळावर येत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सांगून सीतारामन यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. दरम्यान, कोरोनाच्या साथीतून बाहेर पडत असलेल्या भारताची अर्थव्यवस्था आता ‘व्ही शेप रिकव्हरी’ अर्थात उसळी मारून वर येण्याच्या तयारीत असल्याचा विश्‍वास उद्योगक्षेत्राकडून व्यक्त केला जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही पुढच्या काळात भारत ११.५ टक्के इतक्या विकासदराने प्रगती करील, असा निष्कर्ष नोंदविला आहे.

मागच्या दोन महिन्यात देशातील जीएसटी महसूल विक्रमी पातळीवर पोहोचला असून अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे संकेत याद्वारे मिळत असल्याचे दावे केले जातात. भारतीय अर्थव्यवस्थेच्या या कामगिरीचे जगभरात पडसाद उमटू लागले आहेत. कोरोनाची साथ असताना देखील भारताच्या थेट परकीय गुंतवणुकीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. नजिकच्या काळात भारतात अधिक मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणुकीचा ओघ येईल, असे दावे केले जात आहेत.

leave a reply