जुलैच्या मध्यापर्यंत पाकिस्तानातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाखांवर जाईल

- जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

इस्लामाबाद – कोरोनाव्हायरसमुळे पाकिस्तानात २४४ जणांचा बळी घेतल्याचे सांगितले जाते. मात्र या साथीच्या पाकिस्तानातील बळींची संख्या याच्या कितीतरी पट अधिक असून याबाबतची माहिती उघड केली जात नाही, असे आरोप होत आहे. देशातल्या कोरोनाग्रस्तांची खरी संख्या लपवून देखील, पाकिस्तानच्या सरकारला जागतिक आरोग्य संघटनेने धडकी भरविणारा इशारा दिला. जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत पाकिस्तानातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाखांवर जाईल, असे जागतिक आरोग्य संघटनेने बजावले.

पाकिस्तानमध्ये या साथीची लागण झालेल्यांची संख्या ११,५६२वर गेली आहे. गेल्या दोन दिवसात यात वेगाने वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये ७९% रुग्णांना स्थानिक संसर्गातून या साथीची बाधा झाल्याचे पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. वेळीच पाकिस्तानने ही साथ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या नाही, तर पुढे याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने दिला होता. आता डब्ल्यूएचओने पाकिस्तानला खडसावले आहे. जुलैच्या मध्यापर्यंत पाकिस्तानमध्ये या साथीची लागण झालेल्यांची संख्या दोन लाखांवर जाईल, असा इशारा डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेस्यूएस यांनी दिला. तसेच या साथीमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळेल. पाकिस्तानात दारिद्रयरेषेखालील असलेल्या जनतेची संख्या दुपटीने वाढेल, अशी भिती डॉ. टेड्रॉस घेब्रेस्यूएस यांनी व्यक्त केली. वेळीच पाकिस्तानने कडक पावले उचलली नाहीत तर पाकिस्तानात अराजकता माजेल, अशा कडक शब्दात पाकिस्तानला सुनावले. जागतिक आरोग्य संघटनेकडून हा इशारा प्रसिद्ध होत असतानाच पाकिस्तानने देशातला लॉकडाऊन नऊ मे पर्यंत वाढविला आहे.

अशा भयंकर संकटाच्या काळात देखील पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चित्रविचित्र विधाने करून पाकिस्तानातला गोंधळ अधिकच वाढवत आहेत . देशातील कोरोनाग्रस्तांना हुडकून काढण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या मॉडेलचा वापर केला जाईल, असे इम्रान खान यांनी जाहीर केले. हे मॉडेल दहशतवाद्यांना पकडण्यासाठी वापरले जात होते. त्याचा वापर कोरोनाग्रस्तांचा माग काढण्यासाठी केला जाईल, या इम्रान खान यांनी केलेल्या विधानांवर पाकिस्तानचे पत्रकार देखील हैराण झाले आहेत.

leave a reply