अमेरिकेतील कोरोनाच्या बळींची संख्या ५० हजारांवर

वॉशिंग्टन – गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसने अमेरिकेतील ३१७६ जणांचा बळी घेतला असून अमेरिकेतील एकूण बळींची संख्या ५० हजारांवर गेली आहे. त्याचबरोबर या देशात साथीमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या जवळपास १५ हजार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनाव्हायरसमुळे जगभरात १,९३,७३० जणांचा बळी गेला असून या आठवड्याच्या अखेरीपर्यंत जगभरातील बळींची संख्या दोन लाखांवर पोहोचेल, असे दावे केले जातात. या साथीने अमेरिकेत थैमान घातले असून या देशात ५०,८३६ जण या साथीत दगावले. गेल्या चोवीस तासात या देशात कोरोनाचे २६,९७१ नवे रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेतील एकूण रुग्णांची संख्या नऊ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. न्यूयॉर्कमध्ये २०,८६१ तर न्यूजर्सीमध्ये ५,४२८ आणि मॅसेच्यूसेट्स शहरात २,३६० जणांचा बळी गेला आहे. यापैकी अमेरिकेच्या काही शहरांमध्ये मृतांचा खच पडल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या चोवीस तासात ब्रिटनमध्ये या साथीचे ६१६ बळी गेले असून या देशातील एकूण बळींची संख्या १८,३७८ वर गेली आहे. या साथीचा प्रादूर्भाव ब्रिटनमधील एक लाख त्रेचाळीस हजार जणांना झाला आहे. या दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांना फोन करुन त्यांच्याशी चर्चा केली. काही दिवसांपूर्वी जॉनसन कोरोनाच्या साथीतून बरे हाऊन घरी परतले आहेत. पंतप्रधान जॉनसन यांचा ऊत्साह जबरदस्त असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यावेळी सांगितले.

फ्रान्समधील एकूण बळींची संख्या २१,८५६ वर गेली आहे. तर मागच्या काही दिवसांपासून इटलीने आपल्या देशातील कोरोनाच्या साथीबाबतची माहिती उघड केलेली नाही. आपल्या देशात ही साथ नियंत्रणात येत असल्याची माहिती इटलीचे सरकार देत आहे. पण इटलीचे सरकार याबाबतचे तपशील का जाहीर करत नाही, हे मात्र कळू शकलेले नाही.

दरम्यान, चीन आपल्या देशातील कोरोनाच्या बळींची संख्या लपवित असल्याचा आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे. हॉंगकॉंगच्या विद्यापीठाने हा दावा केला असून चीनने जाहीर केलेल्या एकूण कोरोनाच्या बळींपेक्षा चारपट अधिक जण चीनमध्ये बळी गेले आहेत, असे विद्यापीठाने म्हटले आहे. त्याचबरोबर या देशातील कोरोनाबाधितांची संख्या देखील कित्येकपट अधिक असल्याचे या विद्यापीठाने म्हटले आहे.

leave a reply