कोरोनावरील आणखी दोन लसींना ‘सीडीएससीओ’ची मंजुरी

- ‘मोलनुपिराविर’ या औषधालाही मान्यता

नवी दिल्ली – देशातील ओमिक्रॉमनमुळे तिसर्‍या लाटेचा धोका वाढला असाताना देशात कोरोनावरील आणखी दोन लसी आणि एक औषध उपलब्ध झाले आहे. ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ने (सीडीएससीओ) आपत्कालीन परिस्थितीत ‘कोवोवॅक्स’, ‘कारबेवॅक्स’ या लसीसह कोरोनावरील औषध ‘मोलनुपिराविर’च्या वापरास मंजुरी दिली आहे. नवीन लसीला देण्यात आलेल्या मान्यतेमुळे देशात मंजुरी मिळालेल्या लसींची संख्या आठवर पोहोचली आहे. त्यामुळे देशात या साथीविरोधातील लढ्यात कोरोना प्रतिबंधक आणि उपचारात्मक अशा १२ लसी आणि औषधे सध्या उपलब्ध झाली आहेत.

कोरोनावरील आणखी दोन लसींना ‘सीडीएससीओ’ची मंजुरी - ‘मोलनुपिराविर’ या औषधालाही मान्यतागेल्या काही दिवसात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यातच ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर तिसर्‍या लाटेचा धोका असल्याचे इशारे तज्ज्ञांकडून देण्यात येत आहेत. केंद्र सरकारनेही राज्यांना कडक उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश दिले आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. अशा स्थितीत आणखी दोन लसीच्या आपत्कालीन वापरास देखील मंजुरी देण्यात आली आहे.

‘सीडीएससीओ’तर्फे सिरम इन्स्टिट्युटच्या ‘कोवोवॅक्स’ला मंजुरी देण्यात आली. यासह ‘कारबेवॅक्स’ आणि ‘मोलनुपिराविर’ या औषधाला मान्यता देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले. सध्या सीरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, झायडस कॅडिला या अहमदाबादस्थित कंपनीने विकसित केलेली ‘जॉयकोव्ह-डी’, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस लसीचा वापर करण्यात येत आहे. त्यात आता या दोन लसींना मान्यता देण्यात आल्याने देशात कोरोनाविरोधात वापरण्यात येणार्‍या लसींची संख्या आठवर पोहोचली आहे.

हैदराबादस्थित बायोलॉजिक्स-ई या कंपनीने कोरबेवॅक्स ही लस तयार केली आहे. कोवॅक्सिन आणि ‘जॉयकोव्ह-डी’नंतर कोरबेवॅक्स ही देशात तयार करण्यात आलेली तिसरी लस आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटतर्फे ‘कोवोवॅक्स’ची निर्मिती करण्यात येणार आहे. अमेरिकन फार्मा कंपनी ‘मर्क’ने मोलनुपिराविर औषध तयार केले आहे. अलीकडेच अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशनने मोलनुपिराविर औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती. आता भारताने देखील या औषधाला वापरासाठी मंजुरी दिली आहे.

सिप्ला, सनफार्मासारख्या १३ कंपन्या औषध तयार करतील. हे औषध आता फक्त प्रौढांसाठी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ‘कोवोवॅक्स’ला मंजुरी देण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात डीसीजीआयकडे अर्ज करण्यात आल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटतर्फे देण्यात आली. देशभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच सीडीएससीओतर्फे दोन लसी आणि एका औषधाला मंजुरी देण्यात आल्याने कोरोना विरोधातील लढ्यात रुग्णांवर उपचारासाठी मदत मिळेल असा विश्‍वास व्यक्त करण्यात येतो.

leave a reply