महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली

- राज्यात चोवीस तासात दोन हजाराहून अधिक रुग्ण

मुंबई – राज्यात दरदिवशी आढळत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी राज्यात चोवीस तासात दोन हजार १७२ नवे रुग्ण आढळले आहेत. सोमवारच्या तुलनेत या दैनंदिन रुग्णसंख्येत ५३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. निम्म्याहून अधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. मंगळवारी मुंबईत कोरोनाचे १३७७ नवे रुग्ण आढळले.

राज्यात ओमिक्रॉनसह कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली वाढ चिंताजनक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. दीड आठवड्यांपर्यंत राज्यात दरदिवशी आढळत असलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ३००पर्यंत खाली आली होती. तीच आता दोन हजारच्या पुढे गेली आहे. मंगळवारी राज्यात २२ कोरोनाबाधित रूग्णांचाही मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. एकट्या मुंबईत १ हजार ३७७ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ३३८ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईतील ऍक्टीव्ह केसेसची संख्या ५ हजार ८०३ आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली - राज्यात चोवीस तासात दोन हजाराहून अधिक रुग्णमुंबईसह राज्यात झालेला या कोरोनाच्या स्फोटाने आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. सध्या राज्यात रात्रीची जमावबंदी लागू आहे. मात्र कोरोनाची संख्या वाढल्यास निर्बंध आणखी कडक होण्याचे शक्यता आहे. दिल्लीत मंगळवारी शाळा, चित्रपटगृह व रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईसारख्या शहरातही असेच निर्बंध येण्याची शक्यता वर्तविली जाते.

देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळत आहे. केरळमध्ये दोन हजार ४७४ रुग्णांची मंगळवारी नोंद झाली. महाराष्ट्रातही दोन हजारांच्या पुढे दैनंदिन रुग्णसंख्या गेल्याने पहिल्या व दुसर्‍या लाटेप्रमाणे ही दोन राज्य पुन्हा हॉटस्पॉट ठरतात का? अशी भिती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, देशातील २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोनाचा नवीन व्हेरिअंट ओमिक्रॉनचा फैलाव झाला असून रुग्णसंख्या ६५३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमिक्रॉनचे १६७ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत १६५, केरळमध्ये ५७, तेलंगणा ५५, गुजरात ४९ आणि राजस्थानमध्ये ४६ रुग्ण आहेत.

leave a reply