११ दिवसाच्या घनघोर संघर्षानंतर इस्रायल-हमासमध्ये संघर्षबंदीची घोषणा

- पुन्हा हल्ले चढविल्यास अधिक तीव्र उत्तर देण्याचा इस्रायलचा इशारा - रॉकेट लॉंचर्सच्या ट्रिगरवर बोटे असल्याची हमासची धमकी

जेरूसलेम/गाझा – ११ दिवसाच्या घनघोर संघर्षात जवळपास अडीचशे जणांचा बळी गेल्यानंतर इस्रायल आणि गाझातील दहशतवादी संघटनांमध्ये संघर्षबंदी झाली. या संघर्षबंदीचे आंतरराष्ट्रीय स्तरातून स्वागत होत आहे. ‘या संघर्षात इस्रायलने महत्त्वाची उद्दिष्टे गाठली?असून हमास विचारही करू शकणार नाही, असे हादरे इस्रायलने दिले आहेत’, असे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी म्हटले आहे. मात्र यापुढे गाझातून रॉकेट हल्ले झालेच तर याहून अधिक तीव्र उत्तर दिले जाईल, असा इशारा इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिला आहे. ‘हा संघर्ष संपला असला तरी आमची बोटे अजूनही रॉकेट लॉंचर्सच्या ट्रिगरवर आहेत’, अशी धमकी हमासच्या नेत्याने दिली.

११ दिवसाच्या घनघोर संघर्षानंतर इस्रायल-हमासमध्ये संघर्षबंदीची घोषणागुरुवारी रात्री इजिप्तच्या मध्यस्थीने इस्रायल आणि हमासमध्ये संघर्षबंदीवर यशस्वी चर्चा झाली. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी सुरक्षा बैठकी घेतली व त्यानंतर संघर्षबंदीची घोषणा केली. इस्रायली प्रमाणवेळेनुसार, रात्री दोन वाजता ही संघर्षबंदी लागू करण्यात आली. त्याच्या आधी गाझातून इस्रायलच्या सीमाभागात रॉकेट हल्ले झाले होते. गेल्या ११ दिवसात हमास व इस्लामिक जिहादने इस्रायलवर चार हजाराहून अधिक रॉकेट हल्ले चढविले. तर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल गाझातील दहशतवादी ठिकाणांवर शेकडो हवाई हल्ले केले. या संघर्षात गाझात २३२ जण ठार झाले असून इस्रायलमध्ये १२ जणांचा बळी गेला. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना या संघर्षबंदीची तसेच या ११ दिवसांच्या संघर्षाचे तपशील दिले. ‘इस्रायलमधील प्रत्येक माता, त्यांची मुले, लष्करी जवान यांच्या सुरक्षेचा विचार करूनच आम्ही लढत होतो. अनावश्यक संघर्षात न अडकता गाझापट्टीतील कारवाईत आम्ही काही धाडसी आणि नव्या मार्गांचा अवलंब केला. इस्रायलच्या या कारवाईचा प्रभाव आणि परिणाम इतक्यात सार्वजनिक होणार नाही. हमासच्याही ते लक्षात येणार नाही, पण या संघर्षात आम्ही जी काही उद्दिष्टे समोर ठेवली होती ती यशस्वीरित्या गाठली आहेत’, असे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी स्पष्ट केले.

या कारवाईत हमासचे गाझातील भुयारीमार्गांचे १०० किलोमीटरहून अधिक लांबीचे नेटवर्क उद्ध्वस्त केल्याचे इस्रायलच्या पंतप्रधानांनी घोषित केले. या भुयारी मार्गांच्या नेटवर्कसाठी हमासने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. पण हेच भुयारी मार्ग हमासच्या दहशतवाद्यांसाठी मृत्यूचे सापळे बनले, असा दावा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केला. तर हमासच्या इतर ठिकाणांबरोबरच नऊ ‘टेररिस्ट टॉवर्स’ नष्ट केल्याचे नेत्यान्याहू यांनी ठणकावून सांगितले.

‘या संपूर्ण कारवाईत हमासचे २०० हून अधिक दहशतवादी ठार झाले असून यामध्ये २५ वरिष्ठ कमांडर्सचा समावेश आहे. इस्रायलच्या हल्ल्यातून हमासचे जे काही कमांडर्स आणि दहशतवादी बचावले असले तरी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचल्याखेरीज राहणार नाही. अगदी जमिनीखालीही ते सुरक्षित राहू शकत नाहीत’, असा इशारा इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिला. त्याचबरोबर, ‘रॉकेट्सच्या वर्षावाने इस्रायल घाबरेल, असा गैरसमज हमासने करून घेऊ नये. यापुढे हमासने इस्रायलवर पुन्हा रॉकेट हल्ले चढविले तर जे उरलेले आहे ते देखील गमावून बसाल इतके तीव्र उत्तर देऊ’, असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी बजावले.

दरम्यान, इस्रायलने संघर्षबंदी जाहीर करताच गाझातील हमास व इस्लामिक जिहादचे दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून, हा आपलाच विजय असल्याचे जाहीर करून जल्लोष केला. यावेळी गाझातील हमासचा वरिष्ठ नेता एझात अल-रेशिक याने इस्रायलला धमकावले. ‘जेरूसलेम ही आमच्यासाठी रेडलाईन आहे. सध्या हा संघर्ष संपला असला तरी आमची बोटे अजूनही रॉकेट लॉंचर्सच्या ट्रिगरवर आहेत. इस्रायलविरोधी संघर्षासाठी हमास स्वत:च्या सामर्थ्यात अधिक वाढ करील’, अशी धमकी हमासचा नेता एझातने दिली.

leave a reply