चीनच्या रेडिओ टेलिस्कोपने परग्रहवासियांचे संदेश पकडल्याचा दावा

ASKAP-webबीजिंग/मॉस्को – चीनच्या गुईझोऊ भागात उभारलेल्या अवाढव्य रेडिओ टेलिस्कोपने परग्रहवासियांचे संदेश पकडल्याचा दावा चिनी माध्यमांनी केला आहे. चीनच्या ‘सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी डेली’ या सरकारी दैनिकाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले. मात्र वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर काही काळातच हे वृत्त काढून टाकण्यात आले. त्यामुळे चीनने केलेल्या दाव्यांभोवतालचे गूढ अधिकच वाढले आहे.

गेल्या काही वर्षात परग्रहवासिय तसेच उडत्या तबकड्यांविषयी विविध देशांमधील तज्ज्ञ, विश्लेषक व यंत्रणांकडून दावे करण्यात येत आहेत. उडत्या तबकड्यांचे काही व्हिडिओ प्रसिद्ध झाले असून त्याबाबत अमेरिकी यंत्रणा व प्रशासनाकडून कबुलीही देण्यात आली आहे. अमेरिकी संसदेच्या निर्देशांवरून परग्रहवासिय व उडत्या तबकड्यांबाबत अभ्यास करण्यासाठी ‘टास्कफोर्स’ही उभारण्यात आला होता. अमेरिकेतील आघाडीची अंतराळसंस्था ‘नासा’नेही याबाबत स्वतंत्र अभ्यास करण्याची घोषणा केली आहे.

China's-radio-telescopeया सर्व पार्श्वभूमीवर चीनच्या दैनिकाने अचानक प्रसिद्ध केलेला दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो. चीनच्या ‘मिनिस्ट्री ऑफ सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी’कडून ‘सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी डेली’ हे ऑनलाईन दैनिक प्रसिद्ध करण्यात येते. काही दिवसांपूर्वी या दैनिकात चीनच्या टेलिस्कोपने परग्रहवासियांचे संदेश पकडल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. गुईझोऊ भागात उभारलेल्या आणि ‘स्काय आय’ अथवा ‘फास्ट’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या चीनच्या अवाढव्य टेलिस्कोपने हे संदेश पकडल्याचे वृत्तात सांगण्यात आले होते.

radio-telescopeबातमीमध्ये ‘चायना एक्स्ट्राटेरेस्ट्रिअल सिव्हिलायझेशन रिसर्च ग्रुप’मधील प्रमुख वैज्ञानिक झँग टाँगजिए यांचा उल्लेख होता. त्यांनी अशा प्रकारे संदेश मिळाल्याचे म्हटले होते. 2020 साली दोन तर 2022 मध्ये एक संशयित संदेश मिळाल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले. हे संदेश परग्रहवासियांचे असतील, असा दावा करतानाच त्यासाठी अधिक व खूप काळ संशोधन करावे लागेल, असेही सांगण्यात आले. त्याचबरोबर सदर संशयित व विचित्र संदेश ‘रेडिओ इंटरफिरन्स’चा भाग असू शकतो, असा खुलासाही वैज्ञानिक झँग टाँगजिए यांनी केला होता.

चीनने प्रसिद्ध केलेले हे वृत्त जागतिक प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियाने उचलून धरले. मात्र या प्रसिद्धीनंतर काही काळातच सदर वृत्त वेबसाईटवरून काढून टाकण्यात आले. वृत्त काढण्याबाबत कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण अथवा निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे चीनच्या दैनिकाने दिलेल्या बातमीचे गूढ परग्रहवासियांच्या कथित संदेशाइतके वाढल्याचे दिसत आहे.

दरम्यान, रशियाच्या अंतराळसंस्थेचे प्रमुख दिमित्रि रोगोझिन यांनी परग्रहवासियांच्या अस्तित्वावर आपला विश्वास असल्याचे वक्तव्य केले. हे परग्रहवासिय मानवजातीपेक्षा अधिक बुद्धिमान व तंत्रज्ञानदृष्ट्या अधिक प्रगत असू शकतात आणि पृथ्वीवरील नागरी संस्कृतींचा अभ्यास करत असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

leave a reply