केंद्र सरकारकडून १४ खरीप पिकांच्या हमीभावात वाढ

नवी दिल्ली – केंद्र सरकारने १४ खरीप पिकांच्या हमीभावात (एमएसपी) वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच पीक कर्ज फेडण्याची मुदतही तीन महिन्यांनी वाढवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

केंद्र सरकार, खरीप

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या निर्णयानुसार धान, बार्ली, बाजरी, नाचणी, मूग, शेंगदाणे, सोयाबीन, तीळ आणि कापसाच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. तसेच तूर, उडीद, मूगडाळ आणि मक्याच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. हमीभावात वाढ करण्यासाठी सरकारने सी-२ प्लस ५० हा फार्म्युला वापरला असून यानुसार शेत जमिनीचे भाडे आणि शेतीसाठी आलेल्या खर्चावर व्याजाचाही समावेश हमीभाव करण्यात येतो. तसेच स्वामिनाथन समितीच्या शिफारसीनुसार ५० टक्के किंवा त्याहून अधिक फायदा हमीभावात पकडला जातो.

यानुसार धानाचं हमीभाव वाढवून १८६८ रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. बाजरीला २,१५० रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव मिळणार असून जव अर्थात बार्लीचा हमीभाव २,६२० रुपये करण्यात आला आहे. नाचणी, तीळ, सोयाबीन, सुर्यफुलाचा हमीभाव ५० टक्क्याने वाढविण्यात आला आहे, तर मक्याच्या हमीभावात ५३ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. कापसाचा हमीभाव २७५ रुपयांने वाढवून ५,८२५ करण्यात आला आहे.

याशिवाय कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जफेडण्यासाठीची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच पीक कर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील कर्ज केवळ ४ टक्के व्याजावर उपलब्ध होणार आहे.

leave a reply